मुंबई महापालिका की 'मिनी मंत्रालय' पालिकेच्या इतिहासात प्रथमच पालकमंत्र्यांना स्वतंत्र कार्यालय

नगरसेवक पद अस्तित्वात नसल्याने भाजपचा बोलबाला
मुंबई महापालिका की 'मिनी मंत्रालय' पालिकेच्या इतिहासात प्रथमच पालकमंत्र्यांना स्वतंत्र कार्यालय

मुंबई : मुंबई महापालिकेत कमळ फुलणार, असा दावा भाजपकडून केला जात आहे. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने लक्ष केंद्रीत केले असून आता भाजपचे आमदार तथा उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना पालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर कार्यालय देण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पालकमंत्र्यांना स्वतंत्र कार्यालय देण्यात आल्याने आता मुंबई महापालिका की "मिनी मंत्रालय" अशी चर्चा पालिकेत रंगू लागली आहे. दरम्यान, सर्वपक्षीय नगरसेवकांचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आल्यानंतर मुंबई महापालिकेत भाजपचा बोलबाला आहे.

७ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर मुंबई महापालिकेत प्रशासकीय राज्य आहे. राज्यात भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व नुकतेच सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची सत्ता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभार राज्य सरकारच्या आदेशानुसार सुरु आहे, असा आरोप ठाकरे पक्षाकडून नेहमीच करण्यात येत आहे. राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने मुंबई महापालिकेकडे मोर्चा वळवला आहे. मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालये सील करण्यात आली आहेत. त्यामुळे कुठल्याही पक्षाच्या माजी नगरसेवकांसाठी हक्काचे कार्यालय राहिलेले नाही. मात्र भाजपचे आमदार व मंत्र्यांची पालिका मुख्यालयात ये जा वाढली आहे. त्यात भाजपचे नेते व उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना पालिका मुख्यालयात कार्यालय उपलब्ध झाल्याने भाजपचे माजी नगरसेवक, आमदार खासदार यांच्यासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्र्यांना स्वतंत्र दालन व कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्य सरकारकडून कोणतेही अनुदान न घेता स्वतंत्रपणे कारभार हाकणाऱ्या मुंबई महापालिकेचे स्वतःचे एक अस्तित्व आहे. पण याच महापालिकेतील प्रशासक राज्य सरकारच्या आदेशानुसार काम करत असल्याची चर्चा असून महापालिकेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांची निवड करण्यात येते. पालकमंत्र्यांचा थेट जिल्हाधिकारी यांच्याशी संबंध येतो. पण मुंबई शहर व उपनगरासाठी नेमलेल्या पालकमंत्र्यांसमोर महापालिका प्रशासक नमल्याची चर्चा सुरु आहे. मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर असून उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आहेत. या पालकमंत्र्यांना जे हवं आहे ते पालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून दिले जात आहे. विशेषता मंगल प्रभात लोढा यांचा पालिका प्रशासनावर सर्वाधिक जास्त प्रभाव असल्याचे बोलले जाते. प्रभाग निधी वाटपात ही लोढा यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप ठाकरे पक्षाकडून करण्यात आला.

हेरिटेज इमारतीत कार्यालय!

पालिका मुख्यालयातील हेरिटेज इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पालकमंत्र्यांसाठी दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. एवढेच नाही तर दालनाबाहेर मंगल प्रभात लोढा पालकमंत्री अशी पाटीही लावण्यात आली आहे. ज्या महापालिकेत आतापर्यंत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सुधार समिती अध्यक्ष व विविध समित्यांच्या अध्यक्षांची दालन व त्यांच्या पाट्या बघत आलेल्या कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांची पाटी बघून आश्चर्याचा धक्काच बसला.

आता गप्प नंतर बघाच - किशोरी पेडणेकर

मुंबई महापालिकेत सद्यस्थितीत जे काही घडत आहे ते प्रथमच घडत आहे. त्यामुळे आता जे काही घडत आहे त्यावर भाष्य करणे काही विशेष वाटत नाही. पुढे काय होईल ते नंतर बघाच असा इशारा माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला.

मुख्यालयात भाजपचे कार्यालय थाटले - रवी राजा

मुंबई महापालिका स्वायत्त संस्था आहे. याआधी कधीही पालकमंत्र्यांना पालिका मुख्यालयात कार्यालय दिले नाही. भाजप सध्या मंत्रालयातून कारभार करते. आता मुंबई महापालिकेतून करणार. सर्वपक्षीय कार्यालये बंद आहेत. सध्या मुंबई महापालिकेत प्रशासकीय राज्य असून नियमांना डावलून काम करत आहे. मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधी आल्यानंतर प्रशासनाला प्रत्येक गोष्टींचे उत्तर द्यावे लागणार.

रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका

आयुक्त अकार्यक्षम - राखी जाधव

मुंबई महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासक म्हणून आयुक्तांकडे पालिकेचा संपूर्ण कारभार आहे. पण आयुक्त कार्यक्षम ठरत असल्याने पालकमंत्र्यांना महापालिका मुख्यालयात आणून बसवले. राज्य सरकारलाच महापालिकेचा कारभार चालवायचा असल्यामुळे महापालिका निवडणूक घेणे टाळले जात आहे.

राखी जाधव, मुंबई कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

logo
marathi.freepressjournal.in