सलग तीन दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण

सलग तीन दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण

भारतीय शेअर बाजारात दोलायमान स्थितीनंतर सलग तिसऱ्या दिवशी नकारात्मक वातावरण राहिले. रुपयाही सोमवारच्या सर्वोच्च नीचांकी पातळीवरुन मंगळवारी सावरला. सलग तीन दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण होत आहे. बाजार भांडवलाचा विचार करता तीन दिवसात गुंतवणूकदारांचे ११.२२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यानंतर सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. नंतर दुपारपर्यंत त्यात सुधारणा झाली होती. तथापि, दुपारनंतर अखेरच्या सत्रात विक्रीचा मारा कायम राहिल्याने दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स १०५.८२ अंक किंवा ०.१९ टक्का घसरुन ५४,३६४.८५वर बंद झाला. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ६१.८० टक्के किंवा ०.३८ टक्के घटून १६,२४०.०५ वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत टाटा स्टीलचा समभाग सर्वाधिक ६.९५ टक्के घसरला. तर त्यानंतर सन फार्मा, एनटीपीसी, टायटन, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा आणि आयटीसीच्या समभागात घट झाली. तर हिंदुस्तान युनिलिव्हर लि., एशियन पेंटस‌्, इंडस‌्इंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी, एचडीएफसी बँक यांच्या समभागात ३.२४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सेन्सेक्समधील ३० पैकी १८ कंपन्यांच्या समभागात घसरण झाल्याने एकूण बाजारात नकारात्मक वातावरण होते.

बीएसई स्मॉलकॅप २.११ टक्के आणि मिडकॅप १.९८ टक्के घसरला. क्षेत्रनिहाय धातू - ५.६२ टक्के, युटिलिटीज ४.५७ टक्के, पॉवर ४.३३ टक्के, बांधकाम २.९६ टक्के, बेसिक मटेरियल्स २.६७ टक्के आणि एनर्जी २.५१ टक्के घसरले. तर बँक, वित्तीय कंपन्या आणि एफएमसीजी यांच्यात वाढ झाली.

आशियाई बाजारात टोकियो,सेऊलमध्ये घसरण तर शांघायमध्ये वाढ झाली. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत तेजी होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.८२ टक्के घटून प्रति बॅरलचा भाव १०४ अमेरिकन डॉलर झाला.

क्रूड तेलाच्या दरात घट झाल्याने गेले दोन दिवस घसरणाऱ्या रुपया मजबूत झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयाला मंगळवारी १२ पैशांनी बळ मिळून ७७.३२ झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी ३,३६१.८० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली, अशी माहिती शेअर बाजाराने दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in