
मुंबई : सहा कोटीच्या कोकेनसह दोन विदेशी नागरिकांना मुंबई युनिटच्या नारकोटीक्स कट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. लेसी ऍण्ड्री विल्यम गिल्मोरे आणि रेहेमा ऑगस्टिनो म्नोबेरा अशी या दोघांची नावे असून, या दोघांनाही किल्ला कोर्टाने १७ नोव्हेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.
तीन दिवसांपूर्वी एनसीबीच्या एका पथकाने विलेपार्ले येथील राष्ट्रीय विमातनतळाजवळील हॉटेल इबीसमधील एका रुममध्ये छापा टाकला होता. यावेळी लेसी गिल्मोरे या विदेशी नागरिकाला या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे या अधिकाऱ्यांना दोन किलो वजनाचे कोकेन सापडले होते. या कोकेनची विक्रीसाठी तो मुंबईत आला होता. त्याच्या चौकशीत रेहेमा म्नोबेरा या महिलेची माहिती प्राप्त झाली होती. रेहेमा ही टाझांनिया देशाची नागरिक असून, ती सध्या दिल्लीत वास्तव्यास होती. त्यामुळे एनसीबीचे एक विशेष पथक दिल्लीत गेले होते. या पथकाने दिल्लीतून रेहेमाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत तिचा सहभाग उघडकीस येताच तिला पुढील चौकशीसाठी मुंबई आणण्यात आले होते. त्यांच्याकडून जप्त केलेल्या कोकेनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे सहा कोटी रुपये आहे. एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंद केल्यानंतर या दोघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी या दोघांना लोकल कोर्टाने १७ नोव्हेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.