पर्यावरण संवर्धन काळाची गरज याचा विसर मुंबई महापालिका प्रशासनाला पडला आहे. इलेक्ट्रिक वाहने घेण्याऐवजी सीएनजी गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. २९९ सीएनजी गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याचे पालिकेच्या वाहतूक विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
महापालिकेतील पाणीपुरवठा, सांडपाणी प्रकल्प, रस्ते आणि बांधकाम विभाग तसेच इतर विभागांना सातत्याने विविध कामांसाठी गाड्यांची गरज असते. या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या वापरासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात सात वेगवेगळ्या विभागांचा समावेश असून त्यासाठी एकूण २९९ गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. या सर्व गाड्यांचे मॉडेल जानेवारी २०१८ नंतरचे असावे तसेच गाड्या पांढऱ्या रंगाच्या असाव्यात, असे टेंडरमध्ये म्हटले आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचे उद्धिष्ट होते. मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याऐवजी महापालिका स्वत:च्याच विविध विभागांसाठी सीएनजी गाड्यांसाठी टेंडर मागविण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येत इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्त्वावर उपलब्ध होत नसल्याने सीएनजीचा पर्याय निवडल्याचे समजते.