मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी स्पेशल कमिटीची स्थापना ;एक महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी स्पेशल कमिटीची स्थापना ;एक महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश

पालिकेने नेमलेल्या समितीमध्ये आयआयटीच्या डायरेक्टरने नियुक्त केलेले ३ प्राध्यापक आणि महापालिकेकडून अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांच्या वतीने प्रतिनिधी असणार आहेत

मुंबई : मलबार हिल येथील ब्रिटिशकालीन जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी आयआयटी मुंबईसह स्पेशल कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. पुढील एक महिन्यांत स्पेशल कमिटीने अहवाल सादर केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले. दरम्यान, समितीचा अहवाल येईपर्यंत कामाला स्थगिती देण्यात आली आहे.

मलबार हिल फिरोजशहा मेहता उद्यान (हँगिंग गार्डन) परिसरात असलेला हा जलाशय तब्बल १३५ वर्षे जुना आहे. या जलाशयातून मंत्रालय, चर्चगेट, ताडदेव, ग्रँटरोड, गिरगाव, चंदनवाडी आदी विभागांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या या जलाशयाची आता पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पुनर्बांधणीचे काम पाच टप्प्यात होणार असून पाच वर्षांत हे काम पूर्ण होईल. यामध्ये वर्षभरात कामाचा पहिला टप्पा बांधून पूर्ण केला जाणार आहे. मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करताना पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी पहिल्या टप्प्यात जवळच २३ दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलाशय व १४ दशलक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. नवीन जलाशयातून कुलाबा, फोर्ट, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, सँडहर्स्ट रोड, काळबादेवी, मलबार हिल, नेपियन्सी रोड आणि ग्रँडरोड परिसरात पाणीपुरवठा केला जाणार आहे.

एका महिन्यात निर्णय

पालिकेने नेमलेल्या समितीमध्ये आयआयटीच्या डायरेक्टरने नियुक्त केलेले ३ प्राध्यापक आणि महापालिकेकडून अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांच्या वतीने प्रतिनिधी असणार आहेत. या कामाबाबत पाहणी आणि तपासणी करून एका महिन्याच्या आत अंतिम निर्णय समितीने देण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, दक्षिण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन मलबार हिल जलाशयाची क्षमता आता १५० दशलक्ष लिटरवरून १९० दशलक्ष लिटरपर्यंत वाढवली जाणार आहे. यामुळे दक्षिण मुंबईला मुबलक पाणीपुरवठा करता येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in