सेवा विकास सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षांना अटक

मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत दोन दिवसांची ईडी कोठडी
सेवा विकास सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षांना अटक

मुंबई, दि. ५ - मनी लॉंड्रिंगच्या गुन्ह्यांत सेवा विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अमर साधुराम मुलचंदानी यांना ईडी अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना शुक्रवार ७ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. सेवा विकास सहकारी बँक फसवणुकप्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे. त्यात १२४ एनपीए कर्ज खात्यांमध्ये बँकेचे ४२९ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे ही बँक दिवाळखोरीत निघाली होती. त्याचा फटका बँकेच्या अनेक खातेदारांना झाला होता.

या खातेदारासह ठेवीदारांचे हजारो कोटीचे नुकसान झाले होते. याबाबत बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांनी इतर संचालक, अधिकारी आणि कर्मचार्‍यांविरुद्ध पुण्याच्या स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. या संपूर्ण प्रकरणात मनी लॉंड्रिंग झाल्याचे उघडकीस येताच त्याचा तपास ईडीकडे सोपविण्यात आला होता.

तपासादरम्यान अमर मुलचंदानी हा कौटुुंबिक मालकीप्रमाणे बँक चालवत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याने बँकेतील सार्वजनिक ठेबींना त्यांची वैयक्तिक प्रॉपटी समजून बँकेच्या नियमांचे सर्रासपणे उल्लघंन करुन त्याच्या परिचित आणि विश्‍वासू लोकांना बेकायदेशीरपणे कर्ज मंजूर करुन दिले होते. कर्जाची परतफेड करण्याची संबंधित व्यक्तीची ऐपत आहे का याबाबत कुठलीही शहानिशा करण्यात आली नव्हती. अशा व्यक्तींना कर्ज देताना अमर मुलचंदानी याने त्यांच्याकडून वीस टक्के कमिशन म्हणून पैसे घेतले होते.

या कर्ज मंजुरीला संचालक मंडळाकडून विरोध होऊ नये म्हणून त्याने संचालक मंडळावर त्याच्याच कुटुंबियांची वर्णी लावली होती. त्याने कर्ज दिलेले ९२ टक्के पेक्षा जास्त कर्ज खाजी एनपीए झाली. त्यातून बँकेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊन बँक दिवाळखोरीत निघाली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या बँकेचा परवानाच रिझर्व्ह बँकेने रद्द केला होता. या संपूर्ण कटात अमर मुलचंदानी हा मुख्य आरोपी असल्याने त्याच्यासह इतर बँकेचे संचालक, अधिकारी आणि कर्मचार्‍यांविरुद्ध मनी लॉड्रिंगच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच अमर मुलचंदानीला ईडीच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला कोर्टाने शुक्रवार ७ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

अटकेपूर्वी ईडीने मुलचंदानीसह त्याच्या कुटुंबियांच्या घरासह कार्यालयात छापे टाकले होते. या छाप्यात ईडीने आतापर्यंत १२२ कोटी ३५ लाख रुपयांची बेनामी प्रॉपटीसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आता दोषी असलेल्या इतर संचालक, अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या अटकेसाठी या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in