माजी नगरसेवकांनी काँग्रेसचा हात सोडला; भाजपचे कमळ हाती

आगामी लोकसभा, विधानसभा व मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरला वेग आला आहे.
माजी नगरसेवकांनी काँग्रेसचा हात सोडला; भाजपचे कमळ हाती

मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा व मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरला वेग आला आहे. काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. प्रभाग क्रमांक ८२ चे माजी नगरसेवक जगदीश कुट्टी अमिन व प्रभाग क्रमांक २१६ चे माजी नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इन कमिंग व आऊट गोइंग जोरात सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इन कमिंग सुरुच असून आता काँग्रेसला गळती लागली आहे. काँग्रेसचे वाँर्ड क्र ८२ मध्ये दोन टर्म काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि उत्तर मध्य जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जगदीश कुट्टी अमिन आणि वाँर्ड क्र २१६ चे माजी नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्यासह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी, प्रसाद लाड, भालचंद्र शिरसाट, अमरजीत मिश्र आणि माजी नगरसेवक मुरजी पटेल आदी यावेळी उपस्थित होते. भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत हा प्रवेश झाला.

मुंबईकडे काही जण सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहत होते. मुंबईसाठी काहीच केले नाही. तर कोविडमध्ये जेव्हा मुंबईकर उपचारासाठी धडपड होते तेव्हा हे लोक भ्रष्टाचार करीत होते. मृतांच्या ताळूवरचे लोणी खाणे म्हणजे काय हे यांनी दाखवून दिले आहे. अशा भ्रष्टाचारातून मुंबईकरांची सुटका करुन जेव्हा निवडणूक होईल तेव्हा भाजपा महायुतीचा विजय निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त करीत देवेंद्र फडणवीस यांनी प्रवेश केलेल्या दोन्ही माजी नगरसेवकांचे स्वागत केले.

आणखी माजी नगरसेवक महायुतीच्या गळाला

काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर मंगळवारी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यामुळे काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात गळती लागली असून, आता मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी नगरसेवक महायुतीच्या गळाला लागतील, अशी चर्चा काँग्रेस पक्षातच सुरु आहे. काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांनी भाजपचे कमळ मंगळवारी हाती घेतले. त्यामुळे काँग्रेसचे आणखी काही माजी नगरसेवक महायुतीत सामील होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in