दिलीप माने यांची घरवापसी; सुशीलकुमार शिंदेंची खेळी, प्रणिती शिंदेंचे बळ वाढले

दिलीप माने हे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आहेत. मात्र, त्यांना काँग्रेस पक्षात घेऊन ठाकरे यांना धक्का दिल्याची चर्चा आहे. परंतु दिलीप माने हे मूळ काँग्रेसचेच असल्याने त्यांची घरवापसी झाल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
दिलीप माने यांची घरवापसी; सुशीलकुमार शिंदेंची खेळी, प्रणिती शिंदेंचे बळ वाढले

विशेष प्रतिनिधी/मुंबई

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली असून, त्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा प्रणिती शिंदे यांचे वडील सुशीलकुमार शिंदेही मोर्चेबांधणी करण्यात मग्न आहेत. त्यातूनच काँग्रेस पक्षातून शिवसेनेत दाखल झालेले आणि थेट मध्य सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांच्या विरोधात लढलेले माजी आमदार दिलीप माने यांनी रविवारी घरवापसी केली. त्यामुळे काँग्रेसचे बळ वाढले आहे. माजी आमदार दिलीप माने यांची दक्षिण सोलापूरमध्ये मोठी ताकद आहे. त्याचा फायदा प्रणिती शिंदे यांना होऊ शकतो.

माजी आमदार दिलीप माने यांनी रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दिलीप माने हे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आहेत. मात्र, त्यांना काँग्रेस पक्षात घेऊन ठाकरे यांना धक्का दिल्याची चर्चा आहे. परंतु दिलीप माने हे मूळ काँग्रेसचेच असल्याने त्यांची घरवापसी झाल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चर्चा करून बऱ्याच जागांचा तिढा सोडविला आहे; मात्र, ३ ते ५ जागांवरून अजूनही तिढा कायम आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी सांगली, दक्षिण-मध्य मुंबईच्या जागेवर परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस पक्षात नाराजी आहे; मात्र, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे इंडिया आघाडीच्या कार्यक्रमासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. तसेच शरद पवारही दिल्लीतच आहेत. त्यामुळे वादाच्या जागांवरील तिढा सोडविला जाईल, असे बोलले जात आहे. परंतु उद्धव ठाकरे दिल्लीत असताना काँग्रेसने ठाकरे गटाचे दिलीप माने यांना काँग्रेस पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे एकच चर्चा रंगली आहे. परंतु दिलीप माने यांच्या काँग्रेस प्रवेशाने काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.

सोलापुरात प्रणिती शिंदे, सातपुते यांच्यात लढत

सोलापूर लोकसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघात भाजपचे बळ मोठे आहे. मात्र, भाजप नेत्यांत एकवाक्यता नाही. दुसरीकडे प्रणिती शिंदे यांचे वडील माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पडद्यामागून बळ वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

भाजपवर बाहेरच्या उमेदवारीचा शिक्का

सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते हे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊन सोलापुरातून मैदानात उतरविले आहे. दोन्ही उमेदवार तरुण असल्याने चुरस वाढली आहे; मात्र, माळशिरस तालुका माढा मतदारसंघात असल्याने सातपुते यांच्यावर आयात उमेदवाराचा शिक्का बसला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in