माजी आमदार नरेंद्र मेहतांनी केला जिल्हाध्यक्षाचा केला स्वीकार

माजी आमदार नरेंद्र मेहतांनी केला जिल्हाध्यक्षाचा केला स्वीकार

मीरा भाईंदर भाजपचे जिल्हा कार्यालय व पक्ष नेतृत्वाने नियुक्त केलेल्या जिल्हाध्यक्ष अॅड. रवी व्यास यांना मानत नसल्याचे सांगणारे माजी आमदार नरेंद्र मेहता अखेर नमले. शनिवारी त्यांनी जिल्हा कार्यालयात जाऊन व्यास यांचा जिल्हाध्यक्ष म्हणून स्वीकार केला. यापुढे पालिका निवडणूक व पक्ष व्यास आणि मेहता यांच्या नेतृत्वाखाली झाली पाहिजे, असे यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे व्यास व मेहतांमध्ये दिलजमाई होऊन भाजपतील गटबाजी संपेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून १६ मे रोजीच्या कार्यक्रमात भाजपतील दुफळी दिसू नये, यासाठी हे तातडीचे प्रयत्न केले गेल्याची चर्चा सुरू आहे.

मीरा-भाईंदर विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळूनदेखील नरेंद्र मेहतांना अपक्ष उमेदवार गीता जैन यांच्याकडून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. विविध कारणांनी वादात आणि आरोपांच्या फेऱ्यात सापडून मेहता हे चांगलेच वादग्रस्त ठरल्याने भाजपचा पराभव झाल्याचे कारण प्रामुख्याने सांगितले जाते. त्यातच त्यांची अश्लील व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली व नंतर नगरसेविकेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने ते चांगलेच वादात अडकले.

मेहतांनी त्यांच्या शाळेजवळील पक्षकार्यालय पक्षाच्या नावे इतक्या वर्षात न केल्याने तसेच त्यांच्या कार्यपद्धतीने नाराज तत्कालीन भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी भाईंदर पश्चिम येथे जिल्ह्याचे पक्ष कार्यालय सुरू केले. पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन होऊन देखील मेहता आणि त्यांचे समर्थक पक्षाचे कार्यालय मानत नव्हते. नंतर प्रदेश नेतृत्वाने जिल्हाध्यक्षपदी अॅड. रवी व्यास यांची नियुक्ती केल्यानंतर मेहतांनी त्याला जोरदार विरोध केला तसेच मेहतांना जिल्हाध्यक्ष मानत नसल्याचे ठणकावले. जिल्हाध्यक्षांनी आयोजित केलेल्या पक्ष मेळाव्यास पक्षाचे वरिष्ठ नेते येऊनदेखील मेहता व समर्थकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. इतकेच काय तर मेहतांनी त्यांच्या शाळेच्या आवारात घेतलेल्या सभेत भाजपा संपवायला १ मिनिट लागेल, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in