

पालघर : पालघर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, शिवसेना (शिंदे गट) मधील माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाला पालघरमध्ये राजकीय धक्का बसला असून, महायुतीतील स्थानिक राजकीय समीकरणांची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
२०१४ मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे श्रीनिवास वनगा हे पुत्र आहेत. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत आमदार म्हणून काम केले. पुढे एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्ष नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांच्या राजकीय सक्रियतेतही घट झाल्याचे चित्र होते. अखेर भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी पक्षात प्रवेश केला.
या प्रवेशानंतर वनगा यांनी आपण आणि आपले कुटुंबीय घरवापसीसाठी आतुर असल्याची भावना व्यक्त केली. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता सामान्य कार्यकर्ता म्हणून भाजपच्या वाढीसाठी काम करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. वनगा यांच्या प्रवेशामुळे भाजपला पालघरमध्ये स्थानिक संघटनात्मक बळ मिळण्याची शक्यता आहे.