माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

२००९ ते २०१७ या काळात पांडे यांनी बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक
Published on

‘एनएसई’मधील (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) कर्मचाऱ्यांच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणाशी निगडित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ‘ईडी’ने अटक केली आहे. २००९ ते २०१७ या काळात पांडे यांनी बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे.

‘ईडी’ने ५ जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी संजय पांडेंना सर्वप्रथम बोलावले होते. त्यानंतर बुधवारीही दिवसभर चाललेल्या चौकशीअंती ‘ईडी’ने पांडेंना अटक केली.

संजय पांडे यांनी २००१मध्ये पोलीस खात्याचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी ‘आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ ही आयटी कंपनी सुरू केली होती. २००६ मध्ये पांडे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले, त्यावेळी त्यांनी आपली आई आणि मुलाला कंपनीचे संचालक केले. पांडेंच्या कंपनीला ‘एनएसई’चे सर्व्हर, संगणकीय यंत्रणा आणि माहिती तंत्रज्ञान वापरण्यात आले.

संजय पांडेंची पार्श्वभूमी

संजय पांडे हे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांच्या बदलीनंतर फेब्रुवारी २०२२मध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पांडेंचा कार्यकाळ ३० जून २०२२ रोजी समाप्त झाला.

logo
marathi.freepressjournal.in