मनसुख हिरेन हत्या कटाचे सुत्रधार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा : एनआयए

 मनसुख हिरेन हत्या कटाचे सुत्रधार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा : एनआयए

अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या कटाचे सुत्रधार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा असल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रनेणे (एनआयए) ने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. तसेच या हत्येच्या कथित कटाच्या विविध बैठकांना शर्मांनी हजेरी लावली होती, असे उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि गाडीचे मालक मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना १७ जून २०२१ रोजी अटक केली होती. त्याविरोधात त्यांनी एनआयए न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज फेटाळून लावल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी न्या. ए. एस. चांदुरकर आणि न्या. जी. ए. सानप यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

४५ लाखांची सुपारी

एनआयएकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यानुसार, अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी शर्मा हे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा एनआयएने केला आहे. या प्रकरणातील इतर आरोपींसह शर्मा यांनी पोलीस आयुक्त कार्यालयातील इमारतीच्या आवारात विविध बैठकांना हजेरी लावली होती, तिथेच या गुन्हाचा कथित कट रचला गेला. तसेच बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी ४५ लाख रुपये हिरेनला मारण्यासाठी शर्मांना दिले असल्याचा दावाही एनआयएने प्रतिज्ञापत्रात केला आहे.

शर्माविरोधात गुन्हा दाखल

शर्मा हे एका टोळीचे सक्रिय सदस्य होते. ज्यांनी अंबानी कुटुंबासह लोकांमध्ये दहशत माजवण्याचा कट रचला होता आणि मनसुख हिरेनची हत्या केली होती. हिरेन कटातील एक कमकुवत दुवा होता. मृत हिरेनला या संपूर्ण कटाची माहिती असल्याचा दावा एनआयएने केला आहे. शर्मा आणि या प्रकरणातील इतर आरोपींविरोधात यूएपीएअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल आहे.

मिळालेल्या पुराव्यांवरून शर्मा या गुन्ह्यात थेट सामील होते त्यामुळे शर्मा निर्दोष नसून कट रचणे, दहशतवादी कृत्य करणे, दहशतवादी टोळीचा सदस्य असणे, अपहरण, हत्या आणि पुरावे नष्ट करणे इ. गुन्ह्यात सहभागी असल्याचेही प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in