
मुंबई : नवरात्रोत्सवात ९ दिवस देवीची पूजाअर्चा, दांडियाचे आयोजन हे सगळ्याच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात करण्यात येते. फोर्टच्या इच्छादेवी मंडळातही दांडियाच्या आयोजनासह सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवण्यात येत असून यंदा महिला सशक्तीकरणाव भर देण्यात आला आहे.
महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे फोर्ट येथील पी डी' मेलो रोडवरील अमर मित्र मंडळाचे अध्यक्ष विरेन डाया सोलंकी यांनी दैनिक 'नवशक्ति'शी बोलताना सांगितले.
फोर्टच्या इच्छादेवी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाची स्थापना १९७८ मध्ये झाली. यंदा मंडळाचे ४७ वर्षे सुरू असून दरवर्षी मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. यंदा नवरात्रीनिमित्त फोर्टच्या आईने सामाजिक वसा राखत माँ अमर मित्र मंडळाने महिला सशक्तीकरणावर भर दिला आहे. या नवरात्रीनिमित्त ९ दिवस वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत.
नवरात्रीच्या पवित्र उत्सवामध्ये, स्त्रीशक्तीचा सन्मान करत, आम्ही सर्व महिलांना आत्मविश्वासाने आणि निर्भयपणे जगण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये शिकवू. ही कार्यशाळा केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक बळ देखील देईल, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्या तयार राहतील, असे खजिनदार राजेश निर्मल सारवान यांनी सांगितले.
मंडळाच्या उपक्रमात सहभागी होऊन 'ऑपरेशन सिंदूर 'च्या शौर्याला सलाम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासह, टी-शर्टवर ही ऑपरेशन सिंदूरसाठी जनजागृती केली जात आहे.
यंदा महाराष्ट्रातील मराठवाडा बीड, अमरावती अकोला, धाराशिव आदी जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. शेतपिकांसह जीवितहानी झाली आहे.
महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. राज्य सरकारकडून मदतीचा ओघ सुरू असून मंडळाच्या माध्यमातून औषध, अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष विरेन डाया सोलंकी यांनी सांगितले.
उत्सव 'तिला' घडवणार
फोर्टची आई इच्छादेवी माँ अमर मित्र मंडळातर्फे महिलांसाठी स्व-संरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 'ऑपरेशन सिंदूर' प्रमाणे ही कार्यशाळा महिला-भगिनींना स्वतः चे संरक्षण करण्यासाठी सक्षम बनवेल, असा विश्वास मंडळाचे सेक्रेटरी योगेश रमेश वाघेला यांनी सांगितले.