साडेचार कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश

सोने दिल्यानंतर त्याला ५० हजाराचे कमिशन मिळणार होते
साडेचार कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश

मुंबई : विदेशातून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या सोने तस्करीचा अंमलबजावणी गुप्तचर संचालनाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सहाजणांना या अधिकाऱ्यांनी अटक करुन त्यांच्याकडून साडेचार कोटीचे सोने जप्त केले आहे. अटक आरोपींमध्ये ज्वेलर्स व्यापारी पिता-पूत्रासह एअरपोर्टच्या सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. उमर मोहीन शेख, जमीर गनी तांबे, यासर अब्दुल माजिद ताफेदार, मोहीत वसंतलाल लोटवाणी, अमृतलाल ऊर्फ लक्ष्मण आणि किशोरकुमार अमृतलाल अशी या सहाजणांची नावे आहेत.

अटकेनंतर या सहाजणांना किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गेल्या काही महिन्यांत विदेशात सोने तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. या तस्करीमध्ये एअरवेजच्या काही सुरक्षारक्षकाचा सहभाग असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या तस्कराविरुद्ध डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही मोहीम सुरु असताना दुबईतून काहीजण सोने घेऊन येणार असल्याची माहिती या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाळत ठेवून उमर शेखला ताब्यात घेतले.

त्याच्या बुटातून या अधिकार्‍यांनी काही सोने जप्त केले. त्याच्या चौकशीतून दिल्लीतील विमानतळावर सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍या जमीर तांबे याचे नाव समोर आले होते. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच ते सोने दुबईहून आणले होते. ते सोने त्याला दुबईत नेईस नावाच्या व्यक्तीने दिले होते. उमरला सोने दिल्यानंतर त्याला ५० हजाराचे कमिशन मिळणार होते. त्याच्या चौकशीनंतर या अधिकार्‍यांनी मुंबईतून यासर, उल्हासनगर येथून मोहीत आणि काळबादेवी येथील ज्वेलर्स व्यापारी अमृतलाल व त्याचा मुलगा किशोरकुमार या चौघांना अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in