
मुंबई : बोगस व्हिसावर लंडनला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती-पत्नीसह चौघांना सहार पोलिसांनी अटक केली. या चौघांवर बोगस दस्तावेज सादर करून यूके दूतावास कार्यालयातून व्हिसा मिळविल्याचा आरोप असून याच गुन्ह्यांत चारही आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपींमध्ये रुपल खोडाभाई वालंद, खोडाभाई हसमुखभाई वालंद, ॲॅलन जोसेफ व्हिक्टर आणि विकासकुमार हर्षदभाई पटेल यांचा समावेश आहे. रुपल आणि खोडाभाई हे पती-पत्नी असून मूळचे गुजरातच्या गांधीनगरचे रहिवाशी आहेत. शनिवारी रात्री उशिरा ते दोघेही त्यांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांसोबत लंडनला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. त्यांच्याकडील पासपोर्ट, कामगार स्थालंरित व्हिसाची तपासणी केल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांना संशय आला. या व्हिसाबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या पती-पत्नीला सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. इतर दोन कारवाईत ऍलन व्हिक्टर आणि विकासकुमार पटेल या दोघांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या ताब्यात दिले.