चार बांधकाम प्रकल्प ‘सील’ प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या अंधेरी पूर्वेतील चार बांधकामांवर कारवाई ;२६ दिवसांत ७६३ बांधकामे रोखली

हवेतील गुणवत्ता खालावली असून प्रदूषणात वाढ होत असल्याने बांधकाम ठिकाणी २७ प्रकारची नियमावली जारी केली.
चार बांधकाम प्रकल्प ‘सील’ प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या अंधेरी पूर्वेतील चार बांधकामांवर कारवाई ;२६ दिवसांत ७६३ बांधकामे रोखली

मुंबई : ‘धूळमुक्त मुंबई’साठी बांधकाम ठिकाणी २७ प्रकारची नियमावली २३ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आली. त्यानंतर नियमावलीचे पालन करा, यासाठी सूचना केली. मात्र बांधकाम ठिकाणी नियमावलीला केराची टोपली दाखवली जात असल्याने अंधेरी पूर्वेतील चार बांधकाम प्रकल्प अखेर ‘सील’ करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, बांधकाम ठिकाणी नियमावलीचे पालन न करणाऱ्या ७६३ प्रकल्पांना ३ नोव्हेंबर ते आतापर्यंत ‘स्टॉप वर्क नोटीस’ बजावण्यात आली आहे.

हवेतील गुणवत्ता खालावली असून प्रदूषणात वाढ होत असल्याने बांधकाम ठिकाणी २७ प्रकारची नियमावली जारी केली. ३५ फूट उंच भिंत बांधणे, स्प्रिंकलर बसवणे, धुळीचे कण पसरू नये, यासाठी बांधकाम ठिकाणी पडदे लावणे, डेब्रिजची वाहतूक बंदिस्त वाहनातून करणे, बांधकाम ठिकाणी पाण्याची फवारणी, बांधकामाजवळ वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी, बांधकाम ज्यूट किंवा हिरव्या कपड्याने झाकलेले असावे, अशा प्रकारची नियमावली कंत्राटदार, विकासकांना बंधनकारक करण्यात आली आहे.

या नियमांच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी पालिकेने पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पाच जणांच्या टीम नियुक्त करून सर्व २४ वॉर्डात कारवाई सुरू केली आहे. मात्र पालिकेच्या नियमावलीकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्याने ५५० बांधकाम प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतरही नियमावलीचे पालन होत नसल्याने ७६३ बांधकाम प्रकल्पांना स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आली.

कारवाई अधिक तीव्र होणार

हिवाळ्यात प्रदूषणात वाढ होण्याचा धोका लक्षात घेता, बांधकाम प्रकल्प ठिकाणी नियमावली जारी करण्यात आली आहे. मात्र ‘स्टॉप वर्क नोटीस’ बजावूनही नियमावलीचे पालन होत नसल्याने जागा सील करण्यात आल्या आहेत. ही कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

५५० बांधकामांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

मुंबईत सद्यस्थितीत सुमारे सहा हजारांवर बांधकामे सुरू आहेत. या सर्व बांधकामांना ऑनलाइन नोटीस बजावून धूळ प्रतिबंधक उपायोजना करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. यानंतर कार्यवाही केली नसल्याने ५५० बांधकामांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने आता बांधकामे ‘सील’ करण्याची कार्यवाही केली जात असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in