मुंबईकरांच्या सेवेत सुसज्ज चार रुग्णालये: नवीन वर्षांत पालिकेचे गिफ्ट ; दोन हजार बेड्स वाढणार वांद्रे भाभा, गोवंडी शताब्दी, भगवती, मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयाचा कायापालट

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मिळणाऱ्या मोफत आणि अद्ययावत सुविधांमुळे केवळ मुंबईच नव्हे, राज्य-देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी येत असतात
मुंबईकरांच्या सेवेत सुसज्ज चार रुग्णालये:
नवीन वर्षांत पालिकेचे गिफ्ट ; दोन हजार बेड्स वाढणार वांद्रे भाभा, गोवंडी शताब्दी, भगवती, मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयाचा कायापालट
PM

मुंबई : आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला असून मुंबईकरांना आरोग्य सेवेत कमतरता भासू नये यासाठी गोवंडी शताब्दी, बोरिवली येथील भगवती, वांद्रे भाभा व मुलुंड येथील एम टी अग्रवाल रुग्णालयांचा कायापालट करण्यात आला आहे. या चारही रुग्णालयात अद्यावत सुविधा उपलब्ध केल्या असून, चारही रुग्णालयात दोन हजार अतिरिक्त बेड्स उपलब्ध होणार असून, ३३१ आयसीयू बेड्स आहेत. नवीन वर्षांत मुंबईकरांच्या सेवेत चार रुग्णालये दाखल होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मिळणाऱ्या मोफत आणि अद्ययावत सुविधांमुळे केवळ मुंबईच नव्हे, राज्य-देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी येत असतात. यामध्ये केईएम, शीव, नायर आणि कूपर या मोठ्या रुग्णालयांत दररोज मोठी गर्दी असते. त्यामुळे पालिका आपल्या १६ उपनगरीय रुग्णालयांचा विस्तार आणि काही रुग्णालये नव्याने बांधून सुरू करीत आहे. यामध्ये २०२४ मध्ये नव्या वर्षात चार नवी रुग्णालये अद्ययावत सुविधांसह सुरू केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

सुपरस्पेशालिटी, आयसीयू बेड

- रुग्णालयांच्या नूतनीकरणात वांद्रे भाभा रुग्णायातील बेड ५१ ने वाढून बेडची संख्या सुमारे ४९७ होणार आहे. यामध्ये ३९० जनरल बेड  आणि ६१ आयसीयूचा समावेश असेल. सुपरस्पेशालिटी जनरल ३५ बेड आणि आयसीयू १४ बेड होतील. सुपरस्पेशालिटी मध्ये कॅथलॅब, कार्डियाक आदी सुविधा दिल्या जातील. 

 बोरिवलीच्या ‘भगवती’मध्ये ९० आयसीयू

- बोरिवली पश्चिमच्या भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासामुळे ३७६ बेडची संख्या ४९० होणार आहे. यामध्ये जनरल बेड ३७८ आणि ७० जनरल आयसीयू, ११२ सुपरस्पेशालिटी बेड आणि २० आयसीयू  उपलब्ध होतील. या ठिकाणी कार्डिओलॉजी, डायलिसीस, गॅस्टो्रएन्ट्रॉलॉजी, मेट्रोलॉजी आदी सुविधा उपलब्दा होतील.

मुलुंडच्या ‘अगरवाल’मध्ये प्लॅस्टिक सर्जरी

- मुलुंडच्या एमटी अगरवाल रुग्णालयात २२५ बेडची संख्या एकूण ४७० वर पोहोचणार आहे. यामध्ये ३१० जनरल स्पेशालिटी (६५ आयसीयू), १६० सुपरस्पेशालिटी (३५ आयसीयू) असतील. या ठिकाणी न्युरोलॉजी, कार्डिओलॉजी, प्लॅस्टिक सर्जरी, युरो सर्जरी, गॅस्ट्रो एन्ट्रॉलॉजी, एनआयसीयू अशा सुविधा राहणार आहेत.

गोवंडी शताब्दीत आता ५८० बेड

- गोवंडी शताब्दी रुग्णायात सध्या २१७ बेड असून नव्याने होणार्‍या रुग्णालयामुळे बेडची संख्या ५८० वर पोहोचणार आहे. यामध्ये ३९० जनरल बेड, स्पेशालिटी ५५ आयसीयू , १९० सुपर स्पेशालिटी (२५ आयसीयू) बेड होतील. या ठिकाणी कार्डिओलॉजी, मेडिसीन सर्जरी आदी सुविधाही उपलब्ध केल्या जातील.

'अशी' आहे पालिकेची आरोग्य सुविधा

- प्राथमिक आरोग्य सेवेंतर्गत २११ आरोग्य केंद्रे, १८९ दवाखाने, २७ प्रसूतीगृहे, १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये आणि तृतीय स्तरीय आरोग्य सेवेंतर्गत ४ वैद्यकीय महाविद्यालये, ५ रुग्णालये, १ दंत महाविद्यालय आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in