बनावट नोटा बाळगणाऱ्या चौघांना तुरुंगवास

बनावट भारतीय चलनी नोटा बाळगल्याप्रकरणी चार जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने चांगलाच दणका दिला.
बनावट नोटा बाळगणाऱ्या चौघांना तुरुंगवास
Published on

मुंबई : बनावट भारतीय चलनी नोटा बाळगल्याप्रकरणी चार जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने चांगलाच दणका दिला. न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवत पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

बनावट नोटा जवळ बाळगल्या प्रकरणी सुरुवातीला १६ जानेवारी २०२० रोजी नागपूर येथील महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गुन्हा नोंदवला होता. त्या कारवाईत अधिकाऱ्यांनी १३ लाख ६७ हजार ५०० रुपयांचे बनावट चलन जप्त केले होते. चारही आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या गुन्ह्याचा तपास आपल्या हाती घेतला आणि १० फेब्रुवारी २०२० रोजी पुन्हा नव्याने गुन्ह्याची नोंद केली होती. गुन्ह्याचा सखोल तपास केल्यानंतर एनआयएने ७ एप्रिल २०२० रोजी लालू खान, महेश बागवान, रणधीरसिंग ठाकूर आणि रितेश रघुवंशी या चार आरोपींना अटक करून आरोपपत्र दाखल केले होते. तर पश्चिम बंगालमधील मालदा येथील सोहराब होसेन या पाचव्या व्यक्तीला वाँटेड घोषित करण्यात आले होते.

अधिक तपासादरम्यान एनआयएने २९ जून २०२० रोजी फरार आरोपी सोहराब होसेन याला अटक केली. त्याच्याविरुद्ध २५ सप्टेंबर २०२० रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र, लखनऊ येथील तुरुंगात कोठडीत असताना होसेनचे निधन झाले. अटकेत असलेल्या चार आरोपींना मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने दोषी ठरविले आणि प्रत्येकाला पाच वर्षे तुरुंगवास व प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला.

logo
marathi.freepressjournal.in