जेवणाच्या पैशांवरुन पिता-पूत्रावर चौघांचा प्राणघातक हल्ला

अंधेरीतील घटना; गुन्हा दाखल होताच चारही आरोपींना अटक
जेवणाच्या पैशांवरुन पिता-पूत्रावर चौघांचा प्राणघातक हल्ला

मुंबई : जेवणाच्या पैशांवरुन पिता-पूत्रावर चारजणांच्या एका टोळीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात नरेश ज्ञानदेव बाळशंकर हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी डी. एन नगर पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून चारही आरोपींना अटक केली आहे. कृष्णा एकनाथ आलेकर, प्रविण एकनाथ आलेकर, संतोष अशोक नायर आणि अरुण अजय प्रधान अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. नरेश ज्ञानदेव बाळशंकर हा अंधेरीतील इंदिरानगर परिसरात राहतो. त्यांच्या चुलत भावाचे जे. पी रोड, वायडब्ल्यूसीए हॉस्टेलसमोर ऐश्‍वर्या नावाचे एक झुणका भाकर केंद्र आहे. मात्र नरेशसह त्याचे वडिल ज्ञानदेव बाळशंकर हे झुणका भाकर केंद्र चालवितात. तिथे रिक्षाचालक असलेला कृष्णा आलेकर हा नेहमी जेवणासाठी येत होता. शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजता कृष्णा हा जेवणाचे पैसे देण्यावरुन ज्ञानदेवशी वाद घालत होता. यावेळी नरेशने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने मद्यप्राशन केल्याने तो काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे त्याने त्याला समजावून पाठवून दिले होते. काही वेळानंतर तिथे कृष्णा हा त्याच्या तीन मित्रांसोबत आला. काही कळण्यापूर्वीच या चौघांनी नरेशसह ज्ञानदेव यांना शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. नंतर या चौघांनी त्यांच्यावर दगडासह फरशीने प्राणघातक हल्ला केला. त्यात ते दोघेही जखमी झाले होते. कंट्रोल रुममधून ही माहिती प्राप्त होताच डी. एन नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या नरेशला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले तर ज्ञानदेव यांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले. याप्रकरणी नरेशच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध मारहाणीसह गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या कृष्णा आलेकर, प्रविण आलेकर, संतोष नायर आणि अरुण प्रधान या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in