बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आणखी चार एसी डबलडेकर

हेरिटेज टुरला प्रवाशांची पसंती; लोकेश चंद्र यांची माहिती
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आणखी चार एसी डबलडेकर

मुंबई : वातानुकूलित इलेक्ट्रीक डबलडेकर बसेस प्रवाशांच्या पसंतीस उतरली असून आणखी चार डबलडेकर बसेस मंगळवारपासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत.

बॅकबे आगार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व गेट वे ऑफ इंडिया ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान या वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत धावतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. दरम्यान, उन्हाळी सुट्टी असून मोठ्या प्रमाणावर पर्यटक मुंबईत येत असल्याने रात्रीच्या हेरिटेज टुरला प्रवासी पसंती देत असून रोजचा महसूल २५ लाखांच्या घरात पोहोचल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

मुंबईची दुसरी लाईफ लाईन म्हणून बेस्ट बसेसची ओखळ. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात असलेल्या डबलडेकर बसेस मुंबईची शान आहे. मात्र डबलडेकर बसेसना १५ वर्षे पूर्ण होत असल्याने त्या मोडीत काढण्यात येत असून सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३६ डबलडेकर बसेस आहेत. परंतु मुंबईची शान कायम रहावी यासाठी डबलडेकर बसेसचा ताफा वाढवण्यात येत आहे. पण या डबलडेकर बसेस वातानुकूलित इलेक्ट्रीक असून दोन बसेस प्रवाशांच्या सेवेत धावत असून नुकत्याच दाखल झालेल्या चार वातानुकूलित इलेक्ट्रीक डबलडेकर बसेस मंगळवारपासून प्रवाशांच्या सेवेत असतील, असेही ते म्हणाले.

सहा रुपयांत गारेगार प्रवास

सुरक्षित व गारेगार प्रवास करता यावा यासाठी बेस्ट उपक्रमाने वातानुकूलित इलेक्ट्रीक बसेसचा ताफा वाढीवर भर दिला आहे. तसेच सर्वांत स्वस्त प्रवास म्हणून बेस्ट बसना पसंती दिली जात असून पहिल्या पाच किलोमीटरचा गारेगार प्रवास फक्त सहा रुपयांत करता येत आहे.

उर्वरित एसी डबलडेकर बसेस ऑक्टोबरपर्यंत येणार!

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आतापर्यंत ६ वातानुकूलित इलेक्ट्रीक डबलडेकर दाखल झाल्या आहेत. तर उर्वरित १९४ एसी डबलडेकर बसेस ऑक्टोबरपर्यंत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होतील, असेही लोकेश चंद्र म्हणाले. बसची ऑपरेशनल क्षमता १८० किमी आहे. ४५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये बस १०० किमीपर्यंत धावू शकते, तर संपूर्ण चार्जसाठी ८० मिनिटे लागतात. या बसची बॉडी अॅल्युमिनिअमपासून बनलेली आहे. या एका बसची किंमत जवळपास २ कोटी रुपये आहे. यातून जवळपास ९० प्रवासी प्रवास करू शकतात.

७०० बसेसचा मार्ग खडतर

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ९०० वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. यापैकी २०० एसी डबलडेकर बसेस स्विच मोबॅलिटी कंपनीकडून मिळणार असून ६ बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र ७०० बसेसचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने तांत्रिक कारण देत पुरवठा करण्यास नकार दिला आहे. कंपनीने नकार दिल्यानंतर बेस्ट उपक्रमाने ७०० डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्यासाठी तीन वेळा निविदा मागवल्या. मात्र अद्याप निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने ७०० बसेस येण्याचा मार्ग तूर्तास तरी खडतर झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in