सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आणखी चार अभिनेत्री!

सुमारे २०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सुकेशला ‘ईडी’ने अटक केली आहे. सध्या तो तिहार जेलमध्ये आहे
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आणखी चार अभिनेत्री!

मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या तिहार जेलची हवा खात असलेला ठग सुकेश चंद्रशेखर याच्या संपर्कात जॅकलिन आणि नोरा फतेही या दोघीच नव्हे, तर आणखी चार अभिनेत्रीही असल्याचे ‘ईडी’ने आपल्या तपासात उघड केले आहे. निकिता तांबोळी, चाहत खन्ना, सोफिया सिंग, अरुषा पाटील अशी चौघींची नावे आहेत. या चौघी मॉडेलिंगदेखील  करतात. यातील निकिता बिग बॉसमुळे चर्चेत आली होती. या चौघींनी तिहार जेलमध्ये सुकेशची भेट घेतली होती. 

सुमारे २०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सुकेशला ‘ईडी’ने अटक केली आहे. सध्या तो तिहार जेलमध्ये आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्याशी त्याचे निकटचे संबंध होते, असे ‘ईडी’ला आढळून आले. या दोघींची ‘ईडी’कडून चौकशी करण्यात येत आहे. या दोघीच नव्हे, आणखी चार अभिनेत्री सुकेशच्या संपर्कात होत्या, असे निदर्शनास आले आहे. ‘ईडी’ने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात याचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, या चौघींची ओळख पिंकी इराणी हिनेच करून दिली होती. अभिनेत्री निकिता तांबोळी तिहार जेलमध्ये सुकेशला दोनदा भेटली होती. सुकेशला भेटण्यासाठी निकिता मुंबईहून दिल्लीला आली. बीएमडब्ल्यू कारमध्ये ती तिहार जेलच्या गेट ३ वर पोहोचली, एक इनोव्हा गाडी निकिताला जेलच्या आत घेऊन गेली. कारागृहात प्रवेश करताना निकिताची तपासणी करण्यात आली नाही, असे ‘ईडी’च्या आरोपपत्रात म्हटले आहे.

२०१८ मध्ये ती पहिल्यांदा सुकेशला भेटली होती. यावेळी पिंकीने सुकेशकडून १० लाख रुपये घेतले, त्यापैकी दीड लाख रुपये निकिताला दिले. दुसऱ्या भेटीत सुकेशने निकिताला दोन लाख रुपये रोख आणि गुच्ची एक बॅग भेट दिली होती, असेही आरोपपत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे. 

‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेतील आयशा शर्मा कपूरच्या भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री चाहत खन्ना हिचीदेखील २०१८ मध्येच सुकेशशी भेट झाली होती. त्याने आपले पूर्ण नाव सुकेश चंद्रशेखर रेड्डी असून सन टीव्हीचा मालक आहे, असे तिला सांगितले होते. तर पिंकी इराणीने तिचे नाव आफरीन असल्याचे सांगितले होते. यासोबतच चाहतला दोन लाख रुपये रोख आणि घड्याळ भेट देण्यात आले होते, असे ‘ईडी’ने आरोपपत्रात म्हटले आहे.

‘ईडी’च्या आरोपपत्रानुसार अभिनेत्री सोफिया सिंह तुरुंगात सुकेशला दोनदा भेटली होती. सुकेश हा दक्षिणेतील चित्रपट निर्माता आहे आणि त्याला एका चित्रपटाच्या संदर्भात तिला भेटण्याची इच्छा आहे, असे पिंकी इराणी हिने तिला सांगितले होते. पहिल्या भेटीत सोफियाच्या खात्यात दोन लाख रुपये आणि दुसऱ्यांदा दीड लाख रुपये जमा करण्यात आले होते आणि सोबतच तिला एक एलव्ही बॅग भेट देण्यात आली होती. अभिनेत्री अरुषा पाटील हिने आपण सुकेशला भेटल्याचे ‘ईडी’समोर मान्य केल्याचे आरोपपत्रात पुढे नमूद आहे. 

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in