
मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) - दुबईसह शारजा येथून आणलेल्या सुमारे सव्वासहा कोटी रुपयांच्या गोल्ड तस्करीप्रकरणी चार प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयच्या अधिकार्यांनी अटक केली. मोहम्मद उमर मोहम्मद हारुन फजलवाला, फहीम सलीम वारेवरिया, मुद्दसर आयुब डोचकी आणि अफजल अबूबकार वल्लाह अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांकडून या अधिकार्यांनी दहा किलो वजनाचे सोन्याचे बार हस्तगत केले आहेत. दुबई आणि शारजाहून येणार्या विमानातून काही प्रवासी मोठ्या प्रमाणात गोल्ड तस्करी करणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी दुबई आणि शारजा येथून येणार्या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती.
शनिवारी शारजा येथून आलेल्या मोहम्मद उमर आणि त्याची पत्नी फहीम वारेवारिया या दोघांना या अधिकार्यांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे या अधिकार्यांना सुमारे पाच कोटी रुपयांचे ८ किलो सोन्याचे बार सापडले. चौकशीदरम्यान ते दोघेही १ जूनला शारजा येथे गेले होते. त्यानंतर ते दोघेही दुसर्या दिवशी मुंबईत आले होते. याकामी या दोघांनाही त्यांचा नातेवाईक मुद्दसर डोचकी याने मदत केली होती. त्यानंतर त्याला विमानतळाबाहेर या अधिकार्यांनी अटक केली. दुसर्या कारवाईत या अधिकार्यांनी अफजल वल्लाह या प्रवाशाला अटक केली. अफजल हा गोरेगाव येथे राहत असून तो शनिवारी दुबईहून सोन्याचे बार घेऊन आला होता. त्याच्या बॅगेत या अधिकार्यांनी सव्वा कोटी रुपयांचे दोन किलो सोन्याचे बार जप्त केले आहेत. या चौघांविरुद्ध गोल्ड तस्करीप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर चौघांनाही रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.