प्रभादेवीतील २० लाखांच्या लूटप्रकरणी चौघांना अटक, भावोजीने तीन सहकाऱ्यांच्या मदतीने लुटमार केल्याचे उघड

प्रभादेवीतील सुमारे २० लाखांच्या लूटप्रकरणी चौघांना दादर पोलिसांनी अटक केली. त्यात तक्रारदाराच्या भावोजीचा सहभाग असून त्यानेच इतर तीन सहकाऱ्यांच्या मदतीने ही लुटमार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
प्रभादेवीतील २० लाखांच्या लूटप्रकरणी चौघांना अटक, भावोजीने तीन सहकाऱ्यांच्या मदतीने लुटमार केल्याचे उघड
Published on

मुंबई : प्रभादेवीतील सुमारे २० लाखांच्या लूटप्रकरणी चौघांना दादर पोलिसांनी अटक केली. त्यात तक्रारदाराच्या भावोजीचा सहभाग असून त्यानेच इतर तीन सहकाऱ्यांच्या मदतीने ही लुटमार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दान बहादूर जोरा, लालूसिंग रहेकाल, प्रताप रतन सिंग आणि दानसिंग देबीसिंग कामी अशी या चौघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी दहा लाखांची कॅश जप्त केली आहे. अटकेनंतर या चौघांनाही स्थानिक न्यायालयाने ९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार तरुण प्रभादेवी येथे राहत असून एका खासगी कंपनीत कामाला आहे. त्याला त्याच्या मालकाने वीस लाख रुपये दिले होते. ही कॅश त्याने त्याच्या घरातील कपाटात सुरक्षित ठेवली होती. रविवारी पहाटे त्याच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून तो गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगितले. झडती घेण्याचा बहाणा करून त्याने कपाटातील सुमारे वीस लाख रुपयांची कॅश घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असतानाच दान जोरासह त्याचे तीन सहकारी लालसिंग, प्रताप आणि दानसिंग या तिघांना पनवेल येथून अटक केली. चौकशीत त्यांनीच ही लुटमार केल्याची कबुली दिली. या कटाचा दान जोरा हा मुख्य आरोपी असून तो तक्रारदाराच्या बहिणीचा पती आहे. ते सर्वजण एकाच घरात राहत असल्याने त्याला वीस लाखांची माहिती होती. त्यामुळे त्याने इतर तिघांच्या मदतीने ही लुटमार केली. दानसिंग हा तक्रारदाराच्या घरी तोतया गुन्हे शाखेचा अधिकारी बनून गेला होता. त्याने कपाटातील कॅश काढून तेथून पलायन केले होते. त्यापैकी दहा लाखांची कॅश आरोपींकडून पोलिसांनी हस्तगत केली आहे. अटकेनंतर या चौघांनाही भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in