Mumbai : धक्कादायक प्रकार CCTV त कैद; पोलिसांकडूनच ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न; चार पोलीस निलंबित

कालिना येथील एका तरुणाला ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खार पोलीस ठाण्याच्या चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेजचा स्क्रीनशॉट
सीसीटीव्ही फुटेजचा स्क्रीनशॉट
Published on

मुंबई : कालिना येथील एका तरुणाला ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खार पोलीस ठाण्याच्या चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस अंमलदारांचा समावेश असून ते चौघेही दहशतवादविरोधी पथकात कार्यरत होते. निलंबनानंतर या चौघांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी डॅनियल नावाच्या एका तरुणाला खार पोलिसांच्या एका विशेष पथकाने ताब्यात घेतले होते. डॅनियल हा कालिना येथील एका गोठ्यात कामाला होता. त्याच्याकडे एमडी ड्रग्ज नसताना त्याच्या खिशातून वीस ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडल्याचा आरोप करून त्याला संबंधित पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली. या चौकशीत या चारही पोलिसांनी डॅनियलला ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या चारही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

संपूर्ण प्रकरणात बिल्डरचा सहभागही उघडकीस

या चौकशीत हे चौघेही दोषी आढळल्यास त्यांच्यावर पोलीस सेवेतून बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणात एका बिल्डरचा सहभाग उघडकीस आल्याने त्याचीही पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in