
मुंबई : सुमारे दहा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी एक महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक केली. कृष्णा बबन वाळवणकर असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर गाळ्यासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मिरारोड येथे तक्रारदार राहत असून त्यांचा भाऊ इस्टेट एजंट आहे. त्याने त्यांची कृष्णासोबत ओळख करुन दिली होती. या ओळखीदरम्यान कृष्णाने त्याच्या मालकीचा दहिसर येथे एक गाळा आहे. त्याला पैशांची गरज असल्याने या गाळ्याची विक्री करायची आहे. इतर कोणीही गाळा खरेदी करण्यापेक्षा त्यानेच हा गाळा खरेदी करावा अशी विनंती केली होती. त्यानंतर तक्रारदाराने गाळ्याची पाहणी केल्यानंतर गाळा खरेदीसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यात पंधरा लाखांमध्ये गाळ्याचा व्यवहार झाला. त्यापैकी दहा लाख रुपये त्याने कृष्णाला दिले तर उर्वरित पाच लाख रुपये गाळ्याचा ताबा मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते. मात्र दिलेल्या मुदतीत कृष्णाने त्यांना गाळ्याचा ताबा दिला नाही. वारंवार विचारणा करुनही तो त्यांना टाळत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे गाळ्यासाठी दिलेल्या दहा लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने ही रक्कम परत न केली नाही. तसेच स्वतचा मोबाईल बंद करुन पळून गेला होता. चौकशीअंती हा गाळा त्याचा भाऊ आनंद याच्या नावावर होता. त्याने गाळ्याची दिलेली चावी गाळ्याची नव्हती. अशा प्रकारे गाळा विक्रीचा करार करुन त्याने त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेऊन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे हरिश्चंद्र मिश्रा याने कृष्णा वाळवणकर याच्याविरुद्ध दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना एक महिन्यांपासून फरार असलेल्या कृष्णा वाळवणकर याला अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.