पीएचडी कोर्ससाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक

गोरेगाव येथील घटना; आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
पीएचडी कोर्ससाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक
Published on

मुंबई : पीएचडी कोर्ससाठी घेतलेल्या सुमारे साडेसात लाखांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रणजीत धिरेंद्र बिस्वास या आरोपीविरुद्ध आरे पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. रणजीतने अशाच प्रकारे इतर काही उमेदवारांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले असून एका महिलेने त्याच्याविरुद्ध बंगलोर शहरात तक्रार केली आहे. त्याच्याविरुद्ध आरे पोलीस ठाण्यात झालेला हा दुसरा गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले. ३६ वर्षांचे तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव येथील आरे कॉलनीत राहतात. ते आयटी प्रोफेशनल म्हणून काम करत असून त्यांना आयटी विषयात पीएचडी (डॉक्टरेट) करायची होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते.

विविध वेबसाईटवर माहिती घेताना त्यांना क्योरा नावाच्या एका वेबसाईटवर रणजीत बिस्वास यांची माहितीसह मोबाईल क्रमांक दिसला होता. रणजीत हा तेथील शिक्षण विभागात माजी सल्लागार म्हणून काम पाहत होता. त्यामुळे त्यांनी त्याला फोन करुन या कोर्सविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांना तो कोलकाता येथे राहत असून त्याच्या वडिलांच्या नावाने दोन खाजगी शिक्षण संस्था आहेत. या दोन्ही संस्थेचे काम सध्या तोच पाहत असून त्याने आतापर्यंत एक हजाराहून अधिक तरुणांना पीएचडी पदवीसह ऍडमिशन करुन दिल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी पीएचडीसाठी त्याला प्रवेश मिळवून देण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने या कोर्ससाठी त्यांना दहा लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले होते. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्याला साडेसात लाख रुपये देण्याचे मान्य केले होते.

याच दरम्यान रणजीतने त्यांना भारतातील विविध पीएचडी कॉलेजची माहिती त्यांच्या व्हॉटअपवर पाठविली होती. तसेच त्याला पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून हा कोर्स करण्याचा सल्ला दिला होता. या विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्यासाठी त्याने त्याला टप्याटप्याने साडेसात लाख रुपये दिले होते. त्यात त्यांच्या विद्यापीठातील प्रवेशासोबत थेसीस पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. एप्रिल २०२३ रोजी त्याने त्याचा पुण्यातील विद्यापीठात प्रवेश झाल्याचे सांगून त्याला रजिस्ट्रेशनची माहिती दिली होती. काही दिवसांनी त्यांना त्यांचे ओळखपत्र मिळाले होते. त्यात त्यांच्या पीएचडीचा कालावधीत २०२० ते २०२३ असा होता. तो पूर्णपणे चुकीचा होता.

याबाबत विचारणा केल्यानंतर रणजीतने ते नजरचुकीने झाल्याचे सांगून विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता. रणजीतकडून फसवणुक होत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी त्यांच्या कोर्ससाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. नंतर त्याने त्यांचे कॉल घेणे बंद केले होते. त्यांच्या मॅसेजला तो प्रतिसाद देत नव्हता. याच दरम्यान त्यांच्याकडे मनासा जी नावाच्या एका तरुणीने रणजीत बिस्वासविषयी विचारणा केली होती.

तिलाही त्याने पीएचडी कोर्ससाठी प्रवेश देतो असे सांगून तिची फसवणुक केली होती. याबाबत तिने कर्नाटकच्या बंगलोर शहरातील अण्णापूर्णेश्‍वरी पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे सांगितले. अशा प्रकारे रणजीतने त्यांचीही फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी आरे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रणजीत बिस्वासविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच त्याच्या अटकेसाठी पोलीस पथक कोलकाता येथे जाणार असल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in