
मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या एका दुकलीस एल. टी मार्ग पोलिसांनी अटक केली. सुजीत पांडुरंग शिंदे आणि मनोज मनोहर परब अशी या दोघांची नावे असून, त्यांनी पोलीस असल्याचे सांगून एका तरुणाकडून दंड म्हणून पैसे घेतल्याची कबुली दिली आहे. याच गुन्ह्यांत त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी सायंकाळी पावणेसात वाजता यश जितेंद्र जैन हा शामलदास गांधी मार्ग, गिता भवन हॉटेलसमोर सिगारेट ओढत होता. यावेळी तिथे दोन तरुण आले. त्यांनी ते दोघेही पोलीस असल्याची बतावणी करून या परिसरात सिगारेट पिण्यास मनाई आहे, असे सांगून त्याला दंड म्हणून दोन हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यामुळे त्याने त्यांना दोन हजार रुपये दिले; मात्र पावती न देता ते दोघेही पळून गेले. हा प्रकार तिथे गस्तीवर असलेल्या वाहतूक पोलिसांना समजताच त्यांनी पळून जाणाऱ्या दोन्ही आरोपींचा पाठलाग केला. यावेळी पोलीस हवालदार सुरेश जाधव यांनी काही अंतर गेल्यानंतर दोन्ही तोतया पोलिसांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.