बिल्डरच्या कोट्यातील चार फ्लॅट देण्याची बतावणी करून फसवणूक

बिल्डरच्या कोट्यातील चार फ्लॅटच्या आमिषाने त्याने तक्रारदार व्यावसायिकाची २६ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
बिल्डरच्या कोट्यातील चार फ्लॅट देण्याची बतावणी करून फसवणूक

मुंबई : फ्लॅटच्या आमिषाने एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी मोतीराम आंबेकर या एजंटविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. बिल्डरच्या कोट्यातील चार फ्लॅटच्या आमिषाने त्याने तक्रारदार व्यावसायिकाची २६ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ५२ वर्षांचे तक्रारदार काळाचौकी येथे राहत असून त्यांची एक खाजगी कंपनी आहे. २०१७ साली ते बोरिवली येथे नवीन फ्लॅटच्या शोधात होते. याच दरम्यान त्यांची इस्टेट एजंट म्हणून काम करणाऱ्या मोतीरामशी ओळख झाली होती. त्याने त्यांना बोरिवलीतील शिंपोली, कस्तुर पाकमध्ये शिवगणेश सहकारी सोसायटीचे बांधकाम सुरू असून याच इमारतीमध्ये बिल्डरच्या कोट्यातून चार फ्लॅट प्रत्येकी साठ लाखांना देण्याचे आश्वासन दिले होते.

जानेवारी ते जुलै २०१७ या कालावधीत या चारही फ्लॅटसाठी त्यांनी त्याला सुमारे ३० लाख रुपये आगाऊ दिले होते. पेमेंट झाल्यानंतर त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात एका वर्षांत उर्वरित पेमेंट करून चारही फ्लॅट देण्याबाबत नमूद करण्यात आले होते. मात्र एक वर्षांत त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही.

पैशांची मागणी केल्यानंतर त्याने त्यांना साडेतीन लाख रुपये परत केले. मात्र २६ लाख ५० हजाराचा परस्पर अपहार करून त्याने त्यांची फसवणूक केली होती. तसेच पैशांची मागणी केल्यानंतर तो त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे त्यांनी मोतीरामविरुद्ध काळाचौकी पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मोतीराम आंबेकर याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणूक, शिवीगाळ करून धमकी देणे आदी भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in