बोगस वर्क व्हिसावर विदेशात लोकांना पाठवून फसवणूक
मुंबई : बोगस वर्क व्हिसावर विदेशात लोकांना पाठवून फसवणूक करणाऱ्या कटातील एका मुख्य आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहार पोलिसांनी अटक केली. चिराग पियुशभाई शहा असे या ४६ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी सायंकाळी चिराग शहा हा दुबईला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्या पासपोर्टची तपासणी केल्यानंतर अहमदाबाद इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत रिमार्क लिहिल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याच्या सामानाची झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडे मिनिस्ट्री ऑफ लेबर ऑफ सोशल सिक्युरिटी विभाग, किंग्स्टन, युके यांच्याकडील जेब्सन ली ऍण्ड असोशिएशनच कंपनीचे काही वर्क परमिट सापडले. याच वर्क परमिटवर त्याने काही लोकांना विदेशात पाठविले होते. विदेशात गेलेले संबंधित कोणीही प्रवाशी भारतात परत आले नव्हते. त्यानंतर पियुषला सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.