
मुंबई: विदेशी चलनाच्या मोबदल्यात कमिशनच्या आमिषाने फसवणुक करणार्या सुजन अनिल वस्त नावाच्या एका आरोपीस विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत त्याचे दोन सहकारी पळून गेल्याने त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत. अटकेनंतर सुजनला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दुलार तेजू रंजक हा टॅक्सीचालक असून तो धारावी परिसरात राहतो. १९ ऑगस्टला त्याच्या टॅक्सीत एक प्रवाशी बसला होता. त्याने त्याला त्याच्याकडे शंभर रुपयांचे साडेतीन हजार दिरहाम आहेत. त्याची किंमत साडेतीन लाख रुपये आहे. या चलनाच्या मोबदल्यात त्याला भारतीय चलनाची गरज आहे. त्याने त्याला मदत केल्यास तो त्याला ५० हजार रुपये कमिशन देईल असे सांगितले.
या कमिशनच्या मोहाला बळी पडून त्याने त्याला तीन लाखाचे भारतीय चलन देण्याचे मान्य केले. २१ ऑगस्टला तो तीन लाख रुपये घेऊन विलेपार्ले येथील शहाजी राजे रोड, ठक्कर बेकरीजवळ आला होता. यावेळी या प्रवाशासोबत इतर दोनजण होते. त्यात एका महिलेचा समावेश होता. त्याच्याकडील तीन लाख रुपये घेऊन त्यांनी त्याला रुमालात गुंडाळून दिरहाम दिले. त्यानंतर ते तिघेही तेथून निघून गेले. त्याने रुमाल उघडून पाहिले असता दिरहामऐवजी रद्दीचे पेपर होते.
हा प्रकार लक्षात येताच त्याने या तिघांचा शोध घेतला, मात्र ते तिघेही तेथून पळून गेले होते. फसवणुकीनंतर त्याने विलेपार्ले पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सुजन वस्तला अटक केली. चौकशीत त्याच्यासह इतर दोघांनी ही फसवणुक केल्याची कबुली दिली. या दोघांची नावे पोलिसांना समजली असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.