मुंबई : केवायसी अपडेटच्या नावाने फसवणूक करणाऱ्या एका सायबर ठगाला झारखंड येथून बोरिवली पोलिसांनी अटक केली. हुसैन असगरअली अन्सारी असे या आरोपीचे नाव असून, पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हुसैनने त्याच्या भावासोबत आतापर्यंत अनेकांची फसवणूक केली असून, ते दोघेही ऑनलाईन फसवणुकीचे प्रशिक्षण देत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मूळचे राजस्थानचे रहिवाशी असलेले ४४ वर्षांचे तक्रारदार बोरिवलीतील गोराई परिसरात राहत असून, ४ फेब्रुवारीला त्याला एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँकेचा केवायसी अपडेट करायचे आहे, केवायसी अपडेट करा नाहीतर तुमचे बँक खात्यातील व्यवहार बंद होईल, असे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने त्याच्या भावाला ही माहिती दिली. त्याने तो फ्रॉड कॉल असल्याचे सांगून त्याला प्रतिसाद देऊ नकोस असा सल्ला दिला. याचदरम्यान त्यांचा मोबाईल हॅक करून अज्ञात सायबर ठगाने त्यांच्या खात्यातून सुमारे दोन लाख रुपयांचे दोन ऑनलाईन व्यवहार केले होते. पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज प्राप्त होताच त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती.