
मुंबई : गृहकर्ज असलेल्या रुमची विक्री करून दहा लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार मुलुंड परिसरात घडला. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध नवघर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. शामराजी बेलदार, रामहरी शामराजी बेलदार आणि ज्ञानमती रामहरी बेलदार अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. चंदन रामकिशोर बेलदार हा मुलुंड येथे राहत असून तो इमारतींना पेंटीग करण्याचे काम करतो. त्याची रुम छोटी असल्याने तो दुसर्या रुमच्या शोधात होता. याबाबत त्याने त्याच्या काही नातेवाईकांना सांगितले होते. यावेळी त्याचे एक नातेवाईक शामराजी बेलदार याला त्याची मुलुंड येथील एम. पी रोडवरील रुम विक्री करायची आहे अशी माहिती समजली होती. या रुमची पाहणी केल्यानंतर त्याने शामराजी, त्यांचा मुलगा रामहरी आणि सून ज्ञानमती यांच्यासोबत रुमची खरेदी-विक्रीची बोलणी सुरू केली होती. कागदपत्रांवरुन ती रुम शामराजीच्या मालकीची असल्याचे त्याला समजले होते. यावेळी त्यांच्यात रुमचा व्यवहार २२ लाखांमध्ये ठरला होता. त्यानंतर त्याने त्यांना दहा लाख रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा एक करार झाला होता.