
मुंबई : चाळीस टक्के सवलतीच्या घरात ड्रायफ्रुट देण्याचे आमिष दाखवून एका महिलेच्या दोन बँक खात्यातून अज्ञात सायबर ठगाने विविध अकरा ऑनलाईन व्यवहार करुन सुमारे सात लाखांची फसवणुक केल्याची घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकणी या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ड्रायफ्रुटच्या नावाने ऑनलाईन फसवणुकीचा हा पहिला प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ३८ वर्षांची तक्रारदार महिला मुलुंड येथे राहते. २० जुलैला ती फेसबुक पाहत असताना तिला मुलुंड बाय सेल ग्रुपची एक जाहिरात दिसली होती. त्यात ४० टक्के सवलतीच्या दरात ड्रायफुट उपलब्ध असल्याची जाहिरात करण्यात आली होती. या मॅसेजच्या मोबाईलवर संपर्क साधून तिने काही ड्रायफ्रुटची ऑर्डर देताना त्याला पेमेंट केले होते. मात्र दोन दिवसांत तिला ड्रायफ्रुट मिळेल असे सांगून त्याची डिलीव्हरी झाली नव्हती. त्यामुळे तिने संबंधित व्यक्तीला फोन करुन याबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने तिला रिटर्न पेमेंटसाठी काही क्यूआर कोड पाठविले होते. तिने क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तिच्या दोन बँक खात्यातून अकरा वेगवेगळे ऑनलाईन व्यवहार झाले होते. या व्यवहारातून तिच्या खात्यातून सुमारे सात लाख रुपये इतर बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते. पैसे ट्रान्स्फर होत असल्याचे मॅसेज प्राप्त होताच तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने तिचे दोन्ही बँक खाते बंद करुन मुलुंड पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रार अर्जावरुन मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर सेलचे अधिकारी करत आहेत.