
मुंबई : गुंतवणुकीच्या नावाने एका वयोवृद्ध महिलेची दोघांनी सुमारे अकरा लाख तीस हजाराची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फायनान्स एजंट आश्विन मेहता आणि खासगी कंपनीचा मालक योगेश किकाणी अशा दोघांविरद्ध अंधेरी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. ज्योती प्रमोद नेरॉय ही ६२ वर्षांची वयोवृद्ध महिला दहिसर येथे राहते. तिचे पती एका खासगी कंपनीतून २०१४ साली निवृत्त झाले होते. तीन वर्षांनी त्यांचा हृदयविकराच्या झटक्याने निधन झाले होते. तेव्हापासून ती तिथे एकटीच राहत आहे. तिचे पती निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काही रक्कम गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता.
याच दरम्यान त्यांच्या परिचित फायनान्स एजंट आश्विन मेहता याने त्यांना एका खासगी कंपनीत पैसे गुंतवणुकीचा सल्ला देत त्यांना कंपनीतून चांगले व्याजदर मिळवून देतो, असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी योगेश किकाणी याच्या कंपनीत ५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१४ या कालावधीत चौदा लाखांची गुंतवणूक केली होती. यावेळी त्यांना बारा टक्क्याप्रमाणे तीन महिन्यांचे वीस हजार व्याजदर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.