अकरा लाखांची फसवणूक; वॉण्टेड महिलेस अटक

दहा महिन्यानंतर मुख्य आरोपी असलेल्या अनिता कदम हिला पोलिसांनी अटक केली.
अकरा लाखांची फसवणूक; वॉण्टेड महिलेस अटक
Published on

मुंबई : अकरा लाखांच्या फसवणुकप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका महिलेस गोरेगाव पोलिसांनी अटक केली. अनिता बाबली कदम असे या महिलेचे नाव असून, या गुन्ह्यांत अशोक गंगाधारी आणि बाबली एस. कदम हे दोघेही सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. फ्लॅटसाठी पैसे घेऊन ताबा न देता पैशांचा अपहार केल्याचा या तिघांवर आरोप आहे. ३३ वर्षाचे तक्रारदार यांना पाच वर्षांपूर्वी अशोक गंगाधिरी या एजंटने गोरेगाव येथील कुंदननगरात राहणाऱ्या कदम कुटुंबीयांचा मालकीचा एक फ्लॅट असून, हा फ्लॅट त्यांना विकायचा असल्याचे सांगितले. त्यांनाही फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यामुळे त्यांनी बाबली कदम आणि अनिता कदम यांच्यासोबत फ्लॅटची बोलणी सुरू केली होती. यावेळी त्यांच्यात पंधरा लाखांमध्ये फ्लॅट खरेदी-विक्रीचा सौदा झाला होता. याच फ्लॅटसाठी त्यांनी त्यांना अकरा लाख रुपये दिले होते. उर्वरित पैसे फ्लॅटचा ताबा दिल्यानंतर ठरले होते; मात्र ही रक्कम देऊन या तिघांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अशोक गंगाधारी, अनिता कदम आणि बाबली कदम यांच्याविरुद्ध गोरेगाव पोलिसांत तक्रार केली होती. याच गुन्ह्यांत दहा महिन्यानंतर मुख्य आरोपी असलेल्या अनिता कदम हिला पोलिसांनी अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in