
मुंबई : कारसाठी महापालिकेच्या माजी वृद्ध सहाय्यक अभियंत्याची फसवणूक केल्याप्रकरणी सनी पांचाळ या शोरुमच्या मालकाविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. कारसाठी दहा लाख घेऊन या कारची परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विक्री करून सनीने तक्रारदाराची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. सनी हा पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरू आहे. बंडू शंकर कुलकर्णी हे विलेपार्ले येथे राहत असून, ते महानगरपालिकेत सहाय्यक अभियंता म्हणून निवृत्त झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांना एक सेकंट हॅण्ड कार खरेदी करायची होती. यावेळी त्यांच्या एका मित्राने त्यांची ओळख सनी पांचाळशी करून दिली होती. सनीचा बोरिवली येथे ग्रॅव्हिटी मोटर्सचे एक शोरुम आहे. त्याने त्यांना मर्सिडिज कार स्वस्तात देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांनी तीच कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. कारसाठी त्यांनी सनीला दहा लाखांचे पेमेंट केले होते; मात्र त्याने कारसाठी घेतलेल्या दहा लाखांचा अपहार करून त्यांची फसवणूक केली होती.