कॉलसेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची फसवणूक;  विदेशातील एका टोळीचा पर्दाफाश; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कॉलसेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची फसवणूक; विदेशातील एका टोळीचा पर्दाफाश; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

या टोळीने मुंबईसह विविध शहरातील तरुणांना विदेशात आणून त्यांच्या मदतीने विदेशी नागरिकांची गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक केली होती. विविध दंडाच्या नावाने त्यांच्याकडून खंडणी वसुली करून जिवे मारण्याची धमकी दिली होती.

मुंबई : कॉलसेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी विदेशात नोकरीसाठी पाठविलेल्या तरुणांकडून चुकीच्या मार्गाने पैसे उकाळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. जेरी जेकब, गॉडफ्री आणि सनी अशी या तिघांची नावे आहेत.

विदेशात कार्यरत असलेल्या या टोळीचा पर्दाफाश करून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. सिद्धार्थ यादव हा २३ वर्षांचा तक्रारदार तरुण ठाण्यात राहत असून त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता. दोन वर्षांपूर्वी त्याला विदेशात नोकरीची एक संधी आली होती. थायलंडमधील कॉलसेंटरमध्ये क्रिस्टो करन्सी गुंतवणुकीबाबत माहिती देऊन विदेशी नागरिकांना कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्याची ऑफर देण्याबाबत ही नोकरी होती. त्यासाठी त्याला दरमहा ६५ हजार रुपये वेतन मिळणार होते. जास्त वेतन मिळत असल्याने तो थायलंड येथे नोकरीसाठी गेला होता. तिथे त्याच्यासोबत भारतातील विविध शहरातून आलेल्या इतर काही तरुण होते. तिथे या सर्वांचे सोशल मीडियावर बोगस अकाऊंट सुरू करण्यात आले होते. या अकाऊंटच्या माध्यमातून विदेशी नागरिकांशी ओळख करून त्यांना कंपनीत क्रिस्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून त्यांची फसवणूक केली जात होती. मात्र कामापेक्षा विविध कडक नियमांच्या माध्यमातून त्यांच्याकडून मोठ्या रकमेची दंडाची वसुल केली जात होती.

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थसह त्याच्या मित्रांनी भारतीय दूतावास कार्यालयात मेल तसेच कॉलद्वारे तिथे चालणाऱ्या घटनेची माहिती दिली होती. या तक्रारीची भारतीय दूतावास कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिथे छापा टाकून विदेशात नोकरीसाठी आणलेल्या सिद्धार्थसह इतर तरुणांची सुटका केली होती. सुटका केलेल्या या तरुणांना नंतर भारतात पाठविण्यात आले होते. मुंबईत आल्यानंतर सिद्धार्थने तिथे घडेलल्या प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना सांगून संबंधित तिन्ही आरोपी जेरी जेकब, ग्रॉडफ्री आणि सनी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेकडे सुरु आहे.

या टोळीने मुंबईसह विविध शहरातील तरुणांना विदेशात आणून त्यांच्या मदतीने विदेशी नागरिकांची गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक केली होती. विविध दंडाच्या नावाने त्यांच्याकडून खंडणी वसुली करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. सिद्धार्थसह त्याचे इतर सहकारी भारतात परत आले असले तिथे अद्याप अनेक भारतीय तरुणांना ओलीस ठेवण्यात आले आहे. त्यांना जबदस्तीने काम करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

एका रूममध्ये डांबून ठेवले

या टोळीने सुरुवातीला दोन ते तीन महिने त्यांना पगार दिला नव्हता. भारतात जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर या सर्व तरुणांना एका रूममध्ये डांबून ठेवून तिथे त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहण केली जात होती. त्यांच्याकडून विविध कारणासह दंड सांगून खंडणी वसुली केली जात होती.

logo
marathi.freepressjournal.in