पवईतील दोन महिला व्यावसायिकांची फसवणूक ; आरोपीला सात महिन्यांनी अटक

पवईतील दोन महिला व्यावसायिकांची फसवणूक ; आरोपीला सात महिन्यांनी अटक

फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे

फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस सात महिन्यांनी अटक करण्यात पवई पोलिसांना यश आले. जयेश गुरुनाथ म्हात्रे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर पवईतील दोन व्यावसायिक महिलांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार महिला पवई येथे एक खासगी कंपनी चालवत असून याच कंपनीत तिची मैत्रीण भागीदार म्हणून आहे. जयेश हा त्यांच्या परिचित असून गेल्या १२ वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. त्याच्याकडून त्या दोघीही प्रिटिंगचे साहित्य खरेदी करतात. मात्र हरयाणा सरकारकडून व्हिडीओ बनविण्याचे एक कंत्राट मला मिळाले आहे. मात्र आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे भागीदारीत हे कंत्राट पूर्ण करून त्यानंतर ६०-४० टक्के असा नफा विभागून घेऊ, असे आमीष त्याने दाखवले. या आमीषाला भुलून दोन्ही महिलांनी त्याला १६ लाख ५० हजार रुपये दिले होते. हरियाणा सरकारकडून मिळालेल्या वर्क ऑर्डरची कॉपी न दाखवताच, त्याला पैसे देण्यात आले होते.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जयेशकडे पैशांची मागणी केली. सुरुवातीला अडीच लाख रुपये परत केल्यानंतर उर्वरित १४ लाख रुपये देण्याचे टाळल्यानंतर महिलांनी पवई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल होताच जयेश फरार झाला होता. अखेर सात महिन्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याने अशाप्रकारे इतर काहींची फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in