शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने दोन वयोवृद्ध बहिणींची फसवणुक

विक्रोळीतील घटना; पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने दोन वयोवृद्ध बहिणींची फसवणुक

मुंबई : आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष दाखवून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन दोन वयोवृद्ध बहिणींची सुमारे २० लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रथमेश कुडचडकर आणि पूनम प्रथमेश कुडचडकर ऊर्फ पूनम शिवणे अशी या पती-पत्नीविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. ७९ वर्षांच्या सविता बॉम दामेसा या विक्रोळी परिसरात त्यांचा भाऊ शांतीलाल मणिलाल मखवाना (७६) यांच्यासोबत राहतात. त्या एका औषध कंपनीतून निवृत्त झाल्या आहेत. प्रथमेश आणि पूनम हे दोघेही त्यांच्या परिचित असून गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांचा कॉमन मित्र ग्यानेश पांडे यांच्या सांगण्यावरुन त्यांनी त्यांच्याकडे शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी वीस लाख रुपये दिले होते. ते दोघेही शेअरमध्ये कामाला असून अनेकांना त्यांनी शेअरमध्ये चांगला फायदा मिळवून दिला असे सांगून त्यांनी त्यांचा विश्‍वास संपादन केला होता. त्यामुळे सविता व त्यांची बहिण सुशिला सबस्टीयन यांनी त्यांच्याकडे गुंतवणुक केली होती. यावेळी या दोघांनी त्यांना प्रत्येकी दहा लाखांवर दहा टक्के व्याजदर देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी त्यांना काही धनादेश दिले होते. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी त्यांना आरटीजीएसद्वारे २० लाखांचे पेमेंट केले होते. मात्र ठरल्याप्रमाणे तिने दहा टक्के व्याजदराची रक्कम दिली नाही. अकरा महिने उलटून त्यांच्याकडून पैसे मिळत नसल्याने त्यांनी त्यांच्याकडे गुंतवणुक केलेल्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी ही रक्कम न देता वीस लाखांचा परस्पर अपहार करुन दोन्ही बहिणीची फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच सविता दामेसा हिने विक्रोळी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रथमेश व त्याची पत्नी पूनम यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. ते दोघेही बोरिवली परिसरात राहत असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतराची शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

logo
marathi.freepressjournal.in