मुंबई : हॉलिडे पॅकेज बुक करून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक करणार्या जैनेथ ऊर्फ अंकित ऊर्फ गोपाल प्रविणभाई पोपट या मुख्य आरोपीस गुजरात येथून डी. बी मार्ग पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यातील तक्रारदारांनी एका खासगी कंपनीचे सबस्क्रीपशन घेतले होते. ही कंपनीत विविध ठिकाणी सहलीचे नियोजन आणि बुकींग करते. त्यामुळे त्यांनी कंपनीत कॉल करुन त्यांच्या फॅमिलीसाठी केरळ टूरसाठी संपर्क साधला होता.
यावेळी अज्ञात व्यक्तीने टूरसाठी विमान तिकिटासह हॉटेल बुकींग, जेवण आदीसाठी त्यांच्याकडून एक लाख पंधरा हजार रुपये घेतले होते; मात्र ही रक्कम ट्रान्स्फर केल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी डी. बी मार्ग पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीच्या आधारे या पथकाने गुजरातच्या सुरत शहरातून एका ३५ वर्षांच्या संशयिताला ताब्यात घेतल होते. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले होते.