माटुंगा पोलिसांची कामगिरी: खड्यांच्या विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; चौघांना अटक

मुंबई शहरात किंमती खडे विक्रीचा बहाणा करून फसवणूक करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती
माटुंगा पोलिसांची कामगिरी: खड्यांच्या विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; चौघांना अटक

मुंबई : किंमती खड्यांच्या विक्रीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या चौघांना माटुंगा पोलिसांनी अटक केली. संजुर खान, जितेंद्रकुमार ब्राम्हण, प्रकाश टेलर आणि शैलेश चव्हाण अशी या चौघांची नावे असून, त्यांच्याकडून पोलिसांनी विविध प्रकारचे खडे जप्त केले आहेत. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत चारही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई शहरात किंमती खडे विक्रीचा बहाणा करून फसवणूक करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी या टोळीतील आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. यावेळी ही टोळी दादर येथील स्वामी नारायण मंदिराजवळ येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर एपीआय अण्णासाहेब गादेकर, अवधूत बनकर, उपनिरीक्षक विनोद पाटील, अंमलदार दिपक जाधव, घार्गे, म्हात्रे, डांगे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी तिथे आलेल्या संजुर , जितेंद्रकुमार , प्रकाश आणि शैलेश या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी या टोळीने नासीर कादर शेख या व्यक्तीची फसवणूक केली होती. त्यांच्याकडे पोलिसांना निलम, रुबी, पुष्कराज, ओपल आदी खडे सापडले. ही टोळी त्यांच्याकडे तीन ते चार कोटीचे खडे असल्याचे सांगून अनेकांना दादर येथे येण्यास सांगत होते. त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना खडे न देता किंवा बोगस खडे देऊन पळून जात होते.

logo
marathi.freepressjournal.in