मुंबई : गुंतवणुकीवर आकर्षक व्याज देण्याचे आमिषाने २०हून अधिक लोकांची सुमारे १३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अजय महादेव चव्हाण या जोशवा ट्रेडर्स कंपनीच्या मालकाविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अजय चव्हाणने गुंतवणुकीच्या नावाने आतापर्यंत अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. कुर्ला येथील ४७ वर्षांच्या तक्रारदाराला मालाडच्या काचपाडा परिसरात असलेल्या जोशवा ट्रेडर्स कंपनीची माहिती समजली होती. ही कंपनी गुंतवणुकदारांना आकर्षक व्याजदर देते, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी कंपनीत १ लाख २० हजाराची गुंतवणूक केली होती. तसेच त्यांच्या परिचित आणखी १२ जणांनी गुंतवणूक केली होती. मात्र त्यांना व्याजाची रक्कम न मिळाल्याने त्यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती.