कस्टमने जप्त केलेले सोने स्वस्तात देण्याच्या आमिषाने फसवणुक

दोन आरोपींना अटक
कस्टमने जप्त केलेले सोने स्वस्तात देण्याच्या आमिषाने फसवणुक

मुंबई - कस्टमने जप्त केलेले सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची सुमारे अकरा लाखांची फसवणूक करुन पळालेल्या दोन आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली.

मोहम्मद मोहसीन अब्दुल बिलाल चौधरी आणि मोहम्मद अल्फाद अशी त्यांची नावे आहेत. यातील मोहम्मद मोहसीनला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे तर अल्फादला सोमवारी आंधप्रदेशातून मुंबईत चौकशीसाठी आणले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रारदार कुर्ला येथे एक खाजगी शाळा चालवितात. या दोघांना कुटुंबात लग्न असल्याने सोने खरेदी करायचे होते. याच दरम्यान त्यांच्या एका मित्राने त्यांची ओळख अल्फादशी करुन दिली होती. तो कस्टमने जप्त केलेले सोने स्वस्तात देतो, असे सांगितले होते. त्यानंतर ते दोघेही २ जुलैला अल्फादला भेटण्यासाठी कालिना विद्यापीठाबाहेरील एका हॉटेलमध्ये भेटायला आले होते. त्याने या दोघांना सोन्याचे बिस्कीट देण्याचे आश्‍वासन देऊन त्यांच्याकडून अकरा लाख रुपये घेतले होते. काही दिवसांनी त्यांनी त्यांना मुलुंड येथे बोलाविले होते. त्यांच्यातील व्यवहार सुरु असताना तिथे एक इनोव्हा कार आली. यावेळी अल्फादने त्यांना पळून जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ते सर्वजण पोलिसांची धाड पडल्याचे समजून पळून गेले होते. काही वेळानंतर या दोघांनाही हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी मोहम्मद मोहसीनला अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेनंतर मोहम्मद अल्फाद हा आंधप्रदेशला पळून गेल्याचे समजले. त्यानंतर नवघर पोलिसांच्या एका विशेष पथकाने त्याला आंधप्रदेशातून अटक केली. त्याला सोमवारी पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in