मुंबई : एक कोटीच्या गुंतवणुकीवर दिड कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवून गोरेगाव येथील एका व्यावसायिकाची अज्ञात भामट्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका अंगाडियासह दोघांविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. यातील तक्रारदार व्यावसायिक असून, त्यांचा मसाला विक्रीचा होलसेल व्यवसाय आहे. अनेकदा ते दक्षिण मुंबईत कामानिमित्त येत होते. याच दरम्यान त्यांची विकी नावाच्या एका तरुणाशी ओळख झाली होती. तो दिल्लीतील एका एनजीओसाठी काम करत असून, या एनजीओमध्ये रोख स्वरुपात गुंतवणूक केल्यास त्यांना पन्नास टक्के कमिशनचे आमिष दाखविले होते. किमान एक कोटीची गुंतवणूक करा, काही वेळात त्यांच्या खात्यात दिड कोटी रुपये जमा होतील, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याने त्याला एका अंगाडियाच्या समक्ष एक कोटी रुपये दिले होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले; मात्र त्यांनी ती रक्कम ट्रान्स्फर केली नव्हती. त्यामुळे त्यांनी विकीसह संबंधित अंगाडियाला संपर्क साधला होता, मात्र या दोघांचे फोन बंद होते. अंगाडियाच्या कार्यालयात कुलूप लावलेले होते. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.