बीटकॉईन गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या ठगाला अटक

आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचे तपासात उघड
बीटकॉईन गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या ठगाला अटक
Published on

मुंबई : बीटकॉईनच गुंतवणुकीवर दुप्पट रक्कम रक्कम देण्याचे आमिष दाखवून जोगेश्‍वरीतील एका व्यक्तीची सुमारे पावणेसात लाखांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या कटातील आरोपीस ओशिवरा पोलिसांनी अटक केली. रियाजउद्दीन अब्दुल सुभान अहमद असे या आरोपीचे नाव असून, अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. रियाजउद्दीनकडून पोलिसांनी एक लॅपटॉप, दोन मोबाईल, तीन विविध बँकेचे डेबीट कार्ड, एक पासबुक, आधार आणि पॅनकार्ड जप्त केले. त्याच्या दोन विविध बँक खात्यातील एक कोटी छत्तीस लाख रुपयांची कॅश गोठविण्यात यश आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांनी सांगितले.

जोगेश्‍वरी परिसरात राहणार्‍या एका व्यक्तीची बीटकॉईनच्या नावाने फसवणूक करण्यात आली होती. त्याला बीटकॉईन गुंतवणुकीवर दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून एक लिंक पाठविण्यात आली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्याला टेलिग्राम अकाऊंट ओपन झाल्याचे दिसून आले. संबंधित व्यक्तीवर विश्‍वास ठेवून त्याने बीटकॉईनसाठी सुमारे पावणेसात लाखांची गुंतवणूक केली होती; मात्र या व्यक्तीने त्याला दुप्पट रक्कम पाठविले नाही. वारंवार विचारणा करुनही त्याने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलिसात तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणूकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कुरकुटे, अंमलदार अशोक कोंडे, विक्रम सरनोबत, अनिल पाटील यांनी तपास सुरू केला होता. तांत्रिक माहितीवरुन या पथकाने शुक्रवारी वरळी येथून रियाजउद्दीन अहमदला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला. त्याच्या बँक खात्याची माहिती घेतली असता त्याच्या दोन बँक खात्यात १ कोटी ३६ लाख रुपये असल्याचे उघडकीस आले.

logo
marathi.freepressjournal.in