पाळीव मृत प्राण्यांचे मोफत दहन; मालाडच्या स्मशानभूमीत पालिकेकडून सुविधा उपलब्ध

मालाड येथील स्मशानभूमीत लहान आकाराच्या पाळीव मृत प्राण्यांच्या दहनासाठी मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
पाळीव मृत प्राण्यांचे मोफत दहन; मालाडच्या स्मशानभूमीत पालिकेकडून सुविधा उपलब्ध
Published on

मुंबई : मालाड येथील स्मशानभूमीत लहान आकाराच्या पाळीव मृत प्राण्यांच्या दहनासाठी मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सुमारे ५० किलो पेक्षा कमी वजनाच्या मृत प्राण्यांचे या स्मशानभूमीत दहन करण्यासाठी आता ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

भटके, पाळीव प्राण्यांचे लसीकरण, निर्बिजीकरणास प्राण्यासंदर्भात तक्रारी नोंदवणी, प्राणी कल्याणाशी संबंधित विविध उपाययोजनांची माहिती, प्राण्यांसाठी काम करणारे विविध शासकीय विभाग किंवा संस्था इत्यादी माहितीसाठी पालिकेने ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. मायबीएमसी (MyBMC) मोबाइल ॲप्लिकेशन किंवा संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे.

पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. कलिम पाशा पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या या ऑनलाइन सुविधेमध्ये प्राण्यासंदर्भात महानगरपालिकेकडून केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, सोयी-सुविधांची माहिती, प्राण्यांसाठी कार्यरत विविध शासकीय विभाग किंवा संस्था आदी माहिती नागरिकांसाठी देण्यात आलेली आहे.

भटक्या, पाळीव कुत्र्यांची माहिती एका क्लिकवर

भटके किंवा पाळीव श्वानांचे लसीकरण करणे, निर्बिजीकरण करणे तसेच त्यांच्या अनुषंगाने काही तक्रारी किंवा विनंती असल्यास नागरिकांना मायबीएमसी (MyBMC) मोबाईल ॲप्लिकेशनवर जाऊन त्या नोंदवता येतील. www.mcgm.gov.in या संकेतस्थळावरावरील https://vhd.mcgm. gov.in/register- grievance या लिंकवर जाऊनही विनंती किंवा तक्रार नोंदवता येईल. लिंकवर क्लिक केल्यानंतर तक्रार किंवा विनंती यापैकी एकाची निवड करून त्याअंतर्गत विहित माहिती भरावी लागेल. माहिती नोंदवल्यानंतर संबंधित विनंती किंवा तक्रारीसाठी एक विशिष्ट क्रमांक तयार होईल आणि तो नागरिकाच्या थेट मोबाईल क्रमांकावर उपलब्ध होऊ शकेल. या क्रमांकाच्या आधारे नागरिक तक्रार किंवा विनंतीच्या कारवाईबाबतच्या स्थितीचा वेळावेळी आढावा घेऊ शकतील.

ऑनलाईन करू शकता नोंदणी

मालाड येथील स्मशानभूमीत लहान आकाराच्या पाळीव मृत प्राण्यांच्या दहनासाठी मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. https://vhd. mcgm.gov. in/incineration-booking या लिंकवर ही सुविधा उपलब्ध आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना मृत प्राण्यांसंदर्भात संपूर्ण माहिती भरून द्यावी लागेल. तसेच नोंदणी प्रक्रियेपासून पुढील दोन दिवसांच्या आत (आज किंवा उद्या यापैकी एक असं) नेमक्या कोणत्या वेळेत प्राण्याचे दहन करावयाचे आहे, त्या वेळेची (स्लॉट) निवड करावी लागेल. मालाड येथे दुपारी १२ आणि दुपारी ४ वाजता असे दोनदा मृत प्राण्यांचे दहन केले जाते. त्यामुळे नागरिकांनी या दोन्ही दहन कालावधीच्या पूर्वीचीच वेळ निवडावी. नोंदणी तसेच विहित वेळेसंदर्भातील माहिती नागरिकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर नोंदणीनंतर उपलब्ध होईल. निवडलेल्या विहित वेळेत मालाड येथील स्मशानभूमीमध्ये त्यांना प्राण्याचे अंत्यविधी करता येईल.

logo
marathi.freepressjournal.in