भाजपला फ्री हिट, आमची मात्र विकेट! उद्धव ठाकरे : निवडणूक आयोगाला दिले पत्र

काँग्रेसप्रमाणेच उद्धव ठाकरेंनाही आता रामनामाची ॲलर्जी झाली असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे
भाजपला फ्री हिट, आमची मात्र विकेट! उद्धव ठाकरे : निवडणूक आयोगाला दिले पत्र

मुंबई : भाजपला एकीकडे फ्री हिट द्यायची आणि आमची मात्र विकेट घ्यायची. निवडणूक आयोगाने आचारसंहिता बदलली आहे काय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचारसभांमधील विधानांचा दाखला देत त्यांनी निवडणूक आयोगाला याबाबत विचारणा करणारे पत्रही लिहिले आहे. जनतेनेही आता जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, असे म्हणत मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मध्य प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ साली हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून त्यांचा आणि आमच्या काही मतदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता, याची आठवण करून देत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कर्नाटकमध्ये हे ‘बजरंगबली की जय’ म्हणत मतदान करा म्हणाले. अमित शहा तर म्हणत आहेत की अयोध्येत श्री रामाची मोफत दर्शनवारी घडवून आणण्यात येईल. २२ जानेवारीला अयोध्येत राममंदिराचे उद‌्घाटन होणार आहे. भाजपवाले म्हणत आहेत, तिथे पाच कोटी लोक घेऊन जाणार आहेत. आमच्या मनात याबाबत शंका-कुशंका आहेत. भाजपला फ्री हिट द्यायची आणि आमची मात्र विकेट घ्यायची. निवडणूक आयोगाने आचारसंहिता बदलली आहे की काय. आम्ही निवडणूक आयोगाला याबाबत विचारणा करणारे पत्र पाठविले आहे. निवडणूक आयोगाने याचा निर्णय घ्यावा आणि निवडणूक प्रचार पूर्ण व्हायच्या आत याचे उत्तर मिळावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचे सचिव खा. अनिल देसाई यांनी याबाबतची विचारणा करणारे पत्र निवडणूक आयोगाला पाठविले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळ येथून ताब्यात घेतले आहे. कथित फसवणुकीच्या गुन्ह्यात त्यांना न्यायालयाने जामीन नाकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता, ‘‘अद्वय हिरे यांच्या पाठीशी संपूर्ण पक्ष उभा आहे. अद्वय हिरे यांच्यावर कारवाई होते. पण, आम्ही ज्यांच्यावर आरोप केले, त्यांची साधी चौकशीही होत नाही. आमचे सरकार आल्यानंतर सगळ्यांचा हिशोब करणार,’’ असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

ठाकरेंनाही रामनामाची ॲलर्जी -बावनकुळे

काँग्रेसप्रमाणेच उद्धव ठाकरेंनाही आता रामनामाची ॲलर्जी झाली असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. एक्सवरून त्यांनी हे टीकास्त्र सोडले आहे. भाजपला रामनामाचा आणि रामभक्तांचा अभिमान आहे. तुम्हाला मात्र रामनामाचा जप केला की त्रास होतोय. काँग्रेसने प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले होते. आता तुम्ही रामनाम आणि रामभक्तांचा‍ तिरस्कार करत आहात. तुम्ही कितीही विरोध केलात तरी रामभक्त अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतीलच,’’ असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in