फुकट्या प्रवाशांची पळता भुई!एकाच दिवशी १८००हून अधिक प्रवाशांवर कारवाई

या कारवाईतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत ५ लाख ५९ हजार ८०० रुपये दंड जमा झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
फुकट्या प्रवाशांची पळता भुई!एकाच दिवशी १८००हून अधिक प्रवाशांवर कारवाई

मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेअंतर्गत दादर स्थानकात सोमवार १८ डिसेंबर रोजी एकाच दिवशी तब्बल १,८४१ विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत ५ लाख ५९ हजार ८०० रुपये दंड जमा झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

विनातिकीट प्रवास, अंतरापेक्षा अधिकचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. दादर स्थानकात सोमवारी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तब्बल १,८४१ विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७९ तिकीट तपासणीस व १९ आरपीएफ पोलीस तैनात करण्यात आले होते.

दरम्यान, विनातिकीट प्रवास करणे कायद्याने गुन्हा असून विना तिकीट प्रवास टाळा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच तिकीट काढण्यासाठी रांग लावण्याची गरज नसून यूटीएस अॅपवर तिकीट व मासिक पास काढा आणि वेळेची बचत करा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in