मुंबई : घराजवळ दवाखाना या संकल्पनेवर मुंबईत ‘आपला दवाखाना’ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झाले. आतापर्यंत सुरू असलेल्या १७२ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यात आता आणखी १५ दवाखान्यांची भर पडल्याने ‘आपला दवाखान्यां’ची संख्या १८७ वर पोहोचली आहे. सध्या सुरू असलेल्या आपला दवाखान्यात १५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. आपला दवाखान्यात २७ पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर आणि १६० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना समाविष्ट आहेत. डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत आपला दवाखान्यांची संख्या २५० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ येथे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवादेखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपले दवाखाने हे प्रामुख्याने सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते रात्री १० या कालावधीदरम्यान कार्यरत आहेत.
स्वातंत्र्यदिनानिमित्त मंगळवारी सार्वजनिक सुट्टी आहे. १६ ऑगस्टपासून नवीन सर्व दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्यसेवा सुरू करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.