भाईंंदर : मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ नंबर बसस्टॉपशेजारी गौरव वूड्स भागात नेमिनाथ हाईट्स इमारतीसमोर असलेल्या ‘गावठी’ कॅफेत तरुणांची तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे, तर याबाबत मीरारोड पोलीस ठाण्यात हाणामारी करणाऱ्या सहा जणांना अटक करत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी देखील अनेक वेळा ‘गावठी’ कॅफेवर मारामारीच्या घटना घडल्या आहेत.
मीरारोडच्या गौरव फूड परिसरात ‘गावठी’ नामक एक कॅफे आहे. या कॅफेबाहेर मोठ्या संख्येने तरुण मंडळी जमा होत असतात. मंगळवारी सायंकाळी देखील असे काही तरुण जमलेले असताना त्याठिकाणी जवळपास तीस ते चाळीस जणांच्या टोळक्याने येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरून पळापळ सुरू झाली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मात्र यात एकजण गंभीर, तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.